कुणबी दाखला कसा काढावा ? Important माहिती…

कुणबी दाखला कसा काढावा किंवा कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढावे याची संपूर्ण माहिती...

कुणबी दाखला कसा काढावा याची माहिती एका क्लिकवर…

कुणबी दाखला कसा काढावा

मराठा आणि कुणबी एकच असल्याचे अनेक कायदेशीर पुरावे उपलब्ध आहेत, मात्र शासनाच्या आरक्षणात धोरणात मराठा समाज हा खुल्या गटात तर कुणबी समाज हा ओबीसी प्रवर्गात विभागला गेला आहे. त्यामुळे गेली अनेक दशके मराठा समाज त्याच्या हक्काच्या आरक्षणापासून वंचित राहिला आहे. वास्तविक पाहता मराठा समाजाच्या व्यक्तींना देखील कायदेशीर प्रक्रियेने कुणबी दाखला मिळू शकतो. त्याद्वारे कुठलीही मराठा व्यक्ती खुल्या गटातून ओबीसी प्रवर्गात जाऊ शकते. सामूहिक पातळीवर आरक्षणाची लढाई सुरु असतानाच मराठा समाजातील लोकांनी आपापल्या वैयक्तिक पातळीवर कुणबी दाखला मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पूर्वी कुणबी दाखला काढणे म्हणजे जात बदलणे वगैरे अपप्रचार केला गेला, त्या अपप्रचाराला बळी पडून मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. इथून पुढे मराठा समाजाने स्वतःचे नुकसान करुन घेऊ नये.

त्यासाठी मराठा समाजातील व्यक्तींनी कुणबी दाखला कसा काढावा, त्यासाठी कोणती पूर्वतयारी करावी, कोणती कागदपत्रे जमवावीत आणि कुणबी दाखला काढण्याची प्रक्रिया कशी करावी या सर्व बाबींची माहिती आपल्या लोकराज्य.कॉम संकेतस्थळावर देण्याचा प्रयत्न केला आहे. खोटा कुणबी दाखला / जात प्रमाणपत्र तयार करणे हा गुन्हा आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास असे करणाऱ्यांना मिळालेले सर्व लाभ तात्काळ काढुन घेतले जातात. तसेच त्याला कायद्यात शिक्षेची देखील तरतुद आहे.

कुणबी दाखला काढण्यासाठी तीन महत्वाचे टप्पे आहेत.

१) कुणबी असल्याचा पुरावा मिळवणे

२) आवश्यक कागदपत्रे जमा करणे

३) कुणबी दाखला काढणे

कुणबी असल्याचा पुरावा कसा मिळवायचा ?

कुणबी दाखला काढण्यासाठी तुमच्याकडे कुणबी असल्याचा पुरावा असावा लागतो. त्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या १३ ऑक्टोबर १९६७ किंवा या दिनांकाच्या आधी जन्म झालेल्या तुमच्या रक्तनातेसंबंधातील कोणत्याही नातेवाईकाची कुणबी जात असल्याचे सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे. रक्तनातेसंबंधातील नातेवाईक म्हणजे तुमचे वडील / चुलते / आत्या / आजोबा / पणजोबा / खापर पणजोबा / वडिलांचे चुलते किंवा आत्या / आजोबांचे चुलते किंवा आत्या / पणजोबांचे चुलते किंवा आत्या / खापर पणजोबांचे चुलते किंवा आत्या / तुमच्या वाडवडिलांचे सख्खे किंवा चुलत भाऊ-बहिणी ज्यांच्याशी तुमचे नाते दर्शवणारी वंशावळ काढता येते अशी भावकी, इत्यादि. वरीलपैकी कुणाचाही कुणबी असल्याचा पुरावा मिळवण्यासाठी तुम्ही पुढीलपैकी पर्याय तपासून पाहू शकता.

१) रक्तसंबंधातील कोणत्याही नातेवाईकाचा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला काढुन त्यावर कुणबी अशी नोंद आहे का ते तपासावे.

२) स्वातंत्र्यपुर्व काळात गावातील कोतवाल बुक किंवा गाव नमुना नं.१४ मध्ये प्रत्येकाच्या जन्ममृत्युची नोंद त्याच्या जातीसह ठेवली जात असे. पुर्वी या नोंदी दरमहा तहसील कार्यालयात पाठवल्या जायच्या. मात्र १ डिसेंबर १९६३ पासुन कोतवालाचे पद महसुल विभागाकडे वर्ग करण्यात आले आणि त्यानंतर या नोंदी ठेवण्याचे काम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे देण्यात आले. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या रक्तसंबंधातील नातेवाईकाचा जन्म किंवा मृत्यु ज्या गावात झाला असेल, ते गाव कोणत्या तहसील कार्यक्षेत्रात येते ते तपासावे. त्यानंतर संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करुन आपल्या रक्तनातेसंबंधातील नातेवाईकाचे नाव असणाऱ्या गाव नमुना नं. १४ ची किंवा कोतवाल बुकची नक्कल मागणी करावी. नक्कल प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये त्यांची कुणबी अशी नोंद आहे का ते तपासावे.

३) आपल्या कुळातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारस नोंदी (६ ड नोंदी), जमीन वाटप नोंदी, ७/१२ उतारे, ८अ उतारे, फेरफार, खरेदीखत, भाडेपट्टा, सातबारा अंमलात येण्याआधी असणारे क.ड.ई. पत्र, सुडपत्र, खासरा पत्रक, हक्कपत्रक किंवा तत्सम इतर कुठल्याही महसुली कागदपत्रांमध्ये रक्तसंबंधातील कोणत्याही नातेवाईकाचा कुणबी असा उल्लेख आहे का ते शोधावे आणि तसे असेल तर त्या कागदपत्राची प्रत काढून घ्यावी.

४) रक्तसंबंधातील नातेवाईक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असल्यास त्याच्या सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर संबंधित शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयाने त्या नातेवाईकाची कुणबी जात नोंद केलेली असल्यास त्या सर्व्हिस बुकचा साक्षांकित केलेला उतारा घ्यावा.

५) रक्तसंबंधातील नातेवाईकाने अगोदरच त्याचा कुणबी दाखला काढला असेल, तर त्याचा कुणबी दाखला आणि समाज कल्याण खात्याच्या छाननी समितीने वैध ठरवलेले त्याचे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र ही कागदपत्रे देखील कुणबी असल्याचा पुरावा म्हणुन चालू शकतात.

कुणबी दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

१) कुणबी जातीचा पुरावा – वर सांगितल्याप्रमाणे अर्जदाराचा किंवा रक्तसंबंधातील नातेवाईकाचा कुणबी जातीचा पुरावा (संबंधित नातेवाईक जर मृत असेल तर त्याच्या मृत्युचा दाखलाही काढावा.)

२) रहिवासी पुरावा – अर्जदार किंवा त्याचे रक्तसंबंधातील नातेवाईक यांचे १३ ऑक्टोबर १९६७ किंवा या दिनांकाच्या आधीपासून सर्वसाधारण कायमस्वरुपी वास्तव्य असलेल्या ठिकाणचा लेखी रहिवासी दाखला.

३) अर्जदाराचा आणि अर्जदाराच्या रक्तसंबंधातील नातेवाईकाचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनफाईड सर्टिफिकेट (दोन्हींवर जन्मतारीख व जन्मस्थान यांचा उल्लेख आवश्यक).

४) ओळखीचा पुरावा (कोणताही एक) – अर्जदाराचा फोटो असणाऱ्या आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा तत्सम अधिकृत ओळखपत्राची साक्षांकित प्रत.

५) पत्त्याचा पुरावा (कोणताही एक) – अर्जदाराचे रेशनकार्ड, लाईट बिल, मिळकत कर पावती, ७/१२ किंवा ८ अ उतारा, फोन बिल, पाणीपट्टी किंवा घरपट्टीची साक्षांकित प्रत.

६) जातीचा दाखला काढण्यासाठी आवश्यक असणारा विहित नमुन्यातील अर्ज व त्यावर १० ₹ चे कोर्ट फी स्टॅम्प / तिकीट आणि अर्जदाराचा फोटो.

७) १०० ₹ च्या स्टॅम्प पेपरवर अर्जदाराचे स्वतःच्या कुणबी जातीबाबत आणि रक्तसंबंधातील ज्या नातेवाईकाचा कुणबी जातीचा पुरावा सादर केला आहे, त्या नातेवाईकासोबत अर्जदाराचे असणारे नाते दर्शवणारी वंशावळ लिहलेले स्वयं घोषणापत्र / शपथपत्र / प्रतिज्ञापत्र तयार करावे.  

वंशावळ नमुना

८) १९२० पर्यंतची महसुली कागदपत्रे बहुतांशकरुन मोडी लिपीतील असतात. अर्जदाराने कुणबी जातीचा पुरावा म्हणुन सादर केलेले कागदपत्र जर मोडी लिपीतील असेल तर त्या कागदपत्राचे शासन मान्यताप्राप्त मोडी लिपी वाचकाकडुन मराठीत भाषांतर केल्याचे प्रमाणपत्र घ्यावे आणि त्यात दिलेल्या माहितीबाबत १०० ₹ च्या स्टॅम्प पेपरवर स्वयं घोषणापत्र / शपथपत्र / प्रतिज्ञापत्र तयार करावे.

९) अर्जदार किंवा अर्जदाराच्या रक्तसंबंधातील नातेवाईक यापैकी एखाद्याच्या कागदपत्रातील नावात किंवा आडनावामध्ये किरकोळ बदल, वगैरे असल्यास त्याबाबत १०० ₹ स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तयार करावे.

१०) गृहचौकशी अहवाल – पुर्वीच्या काळी शिक्षणाविषयी आस्था नसल्याने लोक शिकत नसत. तसेच जन्ममृत्युच्या नोंदी ठेवण्याचीही लोकांना गरज वाटत नसे. त्यामुळे जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी कागदपत्रांची जमवाजमव करताना खुप अडचणी येतात. खुप प्रयत्न करुनही जातीचा उल्लेख असणारा सक्षम पुरावा उपलब्ध न झाल्याने अनेकदा अर्जदाराचा अर्ज फेटाळला जातो.

या बाबीचा विचार करुन २००४ मध्ये एक शासन निर्णय घेण्यात आला. जर एखाद्या अर्जदाराचा जातीविषयी पुरावा उपलब्ध होत नसेल, तर सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत संबंधित अर्जदाराच्या कुटुंबाची सखोल गृहचौकशी करुन त्याच्या जातीच्या दाव्याची खातरजमा करावी असा तो शासननिर्णय आहे. त्यानुसार तहसीलदार हा मंडल अधिकाऱ्याच्या मार्फत अर्जदाराच्या कुटुंब, शाळा, कागदपत्रे, जमीनविषयक बाबी, जातीविषयक चालीरीती, प्रथा, परंपरा, कुलदैवत, इत्यादींची गृहचौकशी करुन त्याच्या कायमस्वरुपी वास्तव्य आणि जातीबाबत खातरजमा करतो. त्यानंतर तहसीलदार मंडल अधिकाऱ्याच्या गृह चौकशी अहवालाचे अवलोकन करुन अर्जदाराच्या अर्जाबाबत निर्णय घेतो. शक्य असल्यास या गृहचौकशी अहवालाची एक प्रत घ्यावी.

कुणबी दाखला कसा काढावा ?

कुणबी दाखला काढण्याची प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी आपणास माहीत असायला हव्यात, त्या गोष्टी पुढीलप्रमाणे : १) अर्जदाराने आपल्या रक्तसंबंधातील ज्या नातेवाईकाचा १३ ऑक्टोबर १९६७ पुर्वीचा कुणबी असल्याचा पुरावा सादर केला आहे, त्या नातेवाईकाचे सर्वसाधारण कायमस्वरूपी वास्तव्य ज्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये (तालुका / विभाग / जिल्हा) होते, त्या सक्षम प्राधिकाऱ्याकडेच जातीचा दाखला काढण्यासाठी अर्ज करावा लागतो. स्थलांतरित ठिकाणी जात प्रमाणपत्र दिले जात नसल्याने वडिलांच्या किंवा रक्तसंबंधातील नातेवाईकाच्या कायमस्वरुपी निवासाच्या ठिकाणाशी निगडित कार्यालयामध्येच अर्ज करावा लागतो.

२) अर्जदाराने अन्य राज्य / जिल्हा / तालुक्यामधुन स्थलांतर केले असल्यास, त्या राज्य / जिल्हा / तालुक्यातील सक्षम प्राधिकाऱ्याने अर्जदाराच्या रक्तसंबंधातील नातेवाईकांपैकी कुणाला कुणबी जातीचा दाखला दिला असल्यास, त्या दाखल्याची सत्यप्रत सोबत घ्यावी.

३) अर्जदाराने धर्मांतर केले असल्यास त्याचा धर्मांतरापुर्वीचा जातीचा पुरावा घ्यावा.

४) अर्जदार जर विवाहीत स्त्री असेल, तर तिने अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडावीत. i) विवाहापुर्वीची कुणबी जात सिध्द करणारा कोणताही एक जातीचा पुरावा ii) विवाहाचा पुरावा म्हणुन विवाह नोंदणी दाखला किंवा लग्नपत्रिका किंवा पोलीस पाटलाचा दाखला. iii) राजपत्र / गॅझेटमध्ये प्रसिध्द झालेला नावातील बदल, इत्यादि.

५) घोषणापत्र / शपथपत्र / प्रतिज्ञापत्र i) अर्जदाराचे वय १८ वर्ष पुर्ण असल्यास अर्जदाराने स्वतः स्वयं घोषणापत्र / शपथपत्र / प्रतिज्ञापत्र तयार करावे ii) अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असल्यास अर्जदाराच्या आई, वडिल किंवा कुटुंबातील सज्ञान व्यक्तीने घोषणापत्र / शपथपत्र / प्रतिज्ञापत्र तयार करावे.

६) १३ ऑक्टोबर १९६७ पुर्वीपासुन महाराष्ट्रात वास्तव्यास असल्याचा महसुली पुरावा (उदा.जमीन, घर वगैरे) किंवा शैक्षणिक पुरावा (उदा.शाळा सोडल्याचा दाखला, प्रवेश निर्गम उतारा वगैरे) असे दोन पुरावे मागितले जातात. हे दाेन्ही पुरावे ज्यांना देणे शक्यच नाही, त्यांनी नियमाप्रमाणे शपथपत्र लिहुन द्यावे. त्यात पुरावा न देण्याची सबळ कारणे स्पष्ट करावीत. सक्षम प्राधिकारी त्यावर गृहचौकशी करुन अहवाल मागवतो. त्या अहवालाचा विचार करुन, त्याची शहानिशा करुन तो संबंधितांना कुणबी दाखला देण्याचा किंवा टाळण्याचा निर्णय घेईल अशी तरतुद आहे.

७) जातीचा पुरावा काढताना तो १३ ऑक्टोबर १९६७ च्या अगोदरचा असेल तरच महत्वाचा असतो. नंतरचे पुरावे दुय्यम मानले जातात.

८) शैक्षणिक पुराव्यापेक्षा महसुली पुरावा हा जास्त महत्वाचा मानला जातो. म्हणुन एकवेळ शैक्षणिक पुरावा नसला तरी चालेल, परंतु महसुली पुरावा आवश्यक आहे.

९) कुणबी दाखला काढल्यानंतर आरक्षणाचा प्रत्यक्षात लाभ मिळण्यासाठी त्याच्यासोबत कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र देखील काढुन घ्यावे लागते.

कुणबी दाखला काढण्याची कार्यालयीन प्रक्रिया कशी करावी ?

१) सर्वप्रथम अर्जदाराचा किंवा अर्जदाराच्या १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वी जन्म झालेल्या रक्तसंबंधातील नातेवाईकाचे सर्वसाधारण कायमस्वरूपी वास्तव्य ज्या क्षेत्रात असेल, त्या क्षेत्रातील सेतु / नागरी सुविधा केंद्र / तहसील कार्यालय / मे.प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी जाऊन कुणबी दाखला / जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असणारा अर्ज घ्यावा.

२) अर्जातील सर्व माहिती अचुकपणे भरुन आवश्यक ठिकाणी तुमची सही करावी. त्यावर १० ₹ किंमतीचे कोर्ट फी स्टँप / तिकीट लावावे. अर्जावर तुमचा फोटो लावावा. अर्जासोबत वरच्या यादीत दिलेली सर्व आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावीत.

३) हा पुर्ण भरलेला व आवश्यक कागदपत्रे जोडलेला अर्ज सेतु / नागरी सुविधा केंद्र / तहसील कार्यालयमध्ये / मे.प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये सादर करावा. अर्ज सादर केल्यावर त्याचे टोकन / पोचपावती घ्यावी.

४) सदर टोकनवर तुमचा कुणबी दाखला / जात प्रमाणपत्र मिळण्याची संभाव्य तारीख दिलेली असते. हे टोकन आपल्याजवळ जपुन ठेवावे आणि त्यावर दिलेल्या तारखेला अर्ज सादर केलेल्या ठिकाणी ते दाखवुन आपला कुणबी दाखला घ्यावा. त्यावर मे.प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांची सही-शिक्का असल्याची खात्री करावी. जात प्रमाणपत्र मिळाल्यावर त्याच्या आवश्यक तेवढ्या झेरॉक्स सत्यप्रत (True Copy) तयार करुन ठेवाव्यात, त्यानंतर कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया करायची असते.

५) जर छाननीमध्ये तुमच्या अर्जात किंवा कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्या, तर कुणबी दाखला / जात प्रमाणपत्र देणारा सक्षम अधिकारी तुमच्या अर्जावर तसा शेरा नोंदवून दाखला देण्यास नकार देऊ शकतो. असा शेरा मिळाला असेल तर अर्जातील किंवा कागदपत्रातील त्रुटी दूर करुन आपला अर्ज पुन्हा छाननीसाठी पाठवावा.

६) कुणबी दाखला मिळाल्यानंतर कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र काढणे हा शेवटचा टप्पा असतो. जात पडताळणी झाल्यानंतरच तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र मिळते आणि तुम्ही प्रत्यक्षात कुणबी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी पात्र बनता.

कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र कसे काढावे

कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया

जात पडताळणी प्रमाणपत्र म्हणजेच जात वैधता प्रमाणपत्र, त्यालाच इंग्रजीत Cast Validity Certificate म्हणले जाते. हे प्रमाणपत्र शासकीय नोकरी किंवा पदोन्नती, शासकीय योजना, शैक्षणिक प्रवेश, विविध शिष्यवृत्ती, स्थानिक स्वराज्य संस्थांतील आरक्षित जागांच्या निवडणुका इत्यादिसाठी आवश्यक असते. अर्जदाराच्या रक्तसंबंधातील नातेवाईकांपैकी कुणीही पूर्वीच जर त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र काढले असेल, तर अर्जदाराने जात पडताळणी समितीकडे संबंधित नातेवाईकाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर अर्जदाराला स्वतःचे जात वैधता प्रमाणपत्र काढता येते. रक्तसंबंधातील नातेवाईकाच्या जात वैधता प्रमाणपत्रावर जर जात पडताळणी समितीने कोणताही आक्षेप घेतला नाही, तर अर्जदाराला जात पडताळणीसाठी इतर नवीन कुठलेही पुरावे सादर करण्याची आवश्यकता नसते. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सामाजिक न्याय विभागाने तसा निर्णय घेतला आहे.

कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी तीन महत्वाचे टप्पे आहेत.

१) कुणबी दाखला काढणे

२) आवश्यक कागदपत्रे जमा करणे

३) कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र काढणे

१) कुणबी दाखला काढणे

कुणबी दाखला कसा काढावा याची संपूर्ण माहिती वर देण्यात आली आहे. त्यानुसार प्रक्रिया करुन आपला कुणबी दाखला काढावा आणि पुढे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करावीत.

२) कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

१) सक्षम प्राधिकाऱ्याने अर्जदाराच्या नावाने दिलेला कुणबी जातीचा दाखला

२) उपलब्ध असल्यास अर्जदाराच्या रक्तसंबंधातील नातेवाईकाचे जात वैधता प्रमाणपत्र.

३) रहिवासी पुरावा – अर्जदार किंवा त्याचे रक्तसंबंधातील नातेवाईक यांचे १३ ऑक्टोबर १९६७ किंवा या दिनांकाच्या आधीपासून सर्वसाधारण कायमस्वरुपी वास्तव्य असलेल्या ठिकाणचा लेखी रहिवासी दाखला.

४) अर्जदाराचा आणि अर्जदाराच्या रक्तसंबंधातील नातेवाईकाचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनफाईड सर्टिफिकेट (त्यावर जन्मतारीख व जन्मस्थान यांचा उल्लेख आवश्यक)

५) ओळखीचा पुरावा (कोणताही एक) – अर्जदाराचा फोटो असणाऱ्या आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा तत्सम अधिकृत ओळखपत्राची साक्षांकित प्रत.

६) पत्त्याचा पुरावा (कोणताही एक) – रेशनकार्ड, लाईट बिल, मिळकत कर पावती, ७/१२ किंवा ८ अ उतारा, फोन बिल, पाणीपट्टी किंवा घरपट्टीची साक्षांकित प्रत.

७) कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असणारा विहित नमुन्यातील अर्ज व त्यावर १० ₹ कोर्ट फी स्टॅम्प / तिकीट आणि अर्जदाराचा फोटो.

८) १०० ₹ च्या स्टॅम्प पेपरवर अर्जदाराचे स्वतःच्या कुणबी जातीबाबत आणि रक्तसंबंधातील ज्या नातेवाईकाचा कुणबी जातीचा पुरावा सादर केला आहे, त्या नातेवाईकासोबत अर्जदाराचे असणारे नाते दर्शवणारी वंशावळ लिहलेले स्वयं घोषणापत्र / शपथपत्र / प्रतिज्ञापत्र तयार करावे.

९) १९२० पर्यंतची महसुली कागदपत्रे बहुतांशकरुन मोडी लिपीतील असतात. अर्जदाराने कुणबी जातीचा पुरावा म्हणुन सादर केलेले कागदपत्र जर मोडी लिपीतील असेल तर त्या कागदपत्राचे शासन मान्यताप्राप्त मोडी लिपी वाचकाकडुन मराठीत भाषांतर केल्याचे प्रमाणपत्र घ्यावे आणि त्यात दिलेल्या माहितीबाबत १०० ₹ च्या स्टॅम्प पेपरवर स्वयं घोषणापत्र / शपथपत्र / प्रतिज्ञापत्र तयार करावे.

१०) अर्जदार किंवा अर्जदाराच्या रक्तसंबंधातील नातेवाईक यापैकी एखाद्याच्या कागदपत्रातील नावात किंवा आडनावामध्ये किरकोळ बदल, वगैरे असल्यास त्याबाबत १०० ₹ स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तयार करावे.

३) कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र कसे काढावे ?

कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी महत्वाची लिंक (CCVIS Website)

१) विद्यार्थी – अर्जदाराने जर शाळा / कॉलेजमध्ये प्रवेश घेतला असेल, तर त्याने कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत असणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण (बार्टी) संस्थेच्या वेबसाईटवर जाऊन CCVIS Website बटणावर क्लिक करुन सर्वप्रथम आपले खाते तयार करावे. त्यानंतर कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची मार्गदर्शिका बार्टीच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट घ्यावी, त्यावर आपला फोटो लावावा. आपल्या शाळेच्या /कॉलेजच्या प्राचार्यांचे प्रमाणपत्र घ्यावे. अर्जासोबत वर सांगण्यात आलेली आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावीत.

विद्यार्थ्यांसाठी अर्जाचा नमुना क्र.१६, कागदपत्रांबाबत शपथपत्राचा नमुना क्र.१७, वंशावळीबाबत शपथपत्राचा नमुना क्र.३, शाळेच्या / कॉलेजच्या प्राचार्यांच्या प्रमाणपत्राचा नमुना क्र.१५अ आणि हमीपत्र, इत्यादि सर्व नमुने डाउनलोड करण्यासाठी वर दिलेल्या CCVIS Website या लिंकवर क्लिक करावे.

२) शासकीय / निमशासकीय सेवेतील कर्मचारी – शासकीय / निमशासकीय सेवेतील कर्मचाऱ्याने सुद्धा याच वेबसाईटवर जाऊन CCVIS Website बटणावर क्लिक करुन सर्वप्रथम आपले खाते तयार करावे. त्यानंतर कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची मार्गदर्शिका बार्टीच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट घ्यावी. त्यावर आपला फोटो लावावा. त्यासोबत आपण ज्या शासकीय / निमशासकीय कार्यालयात सेवेत आहात तिथल्या नियुक्ती प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र घ्यावे. अर्जासोबत वर सांगण्यात आलेली आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावीत.

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अर्जाचा नमुना क्र.१८, कागदपत्रांबाबत शपथपत्राचा नमुना क्र.१९, वंशावळीबाबत शपथपत्राचा नमुना क्र.३, नियुक्ती प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, इत्यादि सर्व नमुने डाउनलोड करण्यासाठी वर दिलेल्या CCVIS Website या लिंकवर क्लिक करावे.

३) स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षित जागेसाठी आपला नामांकन अर्ज दाखल करताना अर्जासोबत आपले कुणबी जात प्रमाणपत्र आणि कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र जोडावे लागते. नामांकन अर्ज दाखल करताना कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र नसेल तर त्यासाठी जिल्हा जात पडताळणी समितीकडे प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचे टोकन / पोचपावती जोडावी. मात्र निवडणुक निकालाच्या तारखेपासुन सहा महिन्यांच्या आत आपले जात पडताळणी प्रमाणपत्र संबंधित निवडणुक अधिकाऱ्याकडे सादर करावे लागते, अन्यथा आपले सदस्यत्व आपोआप संपुष्टात येते. त्यासाठी निवडणुक जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी त्वरित जात पडताळणीसाठी आवश्यक असणारा विहित नमुन्यातील अर्ज भरावा, त्यावर आपला फोटो लावावा. त्यासोबत जिल्हाधिकारी / जिल्हा निवडणुक अधिकाऱ्याचे निवडणुकीबाबत प्रमाणपत्र घ्यावे. अर्जासोबत वर सांगण्यात आलेली आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावीत.

उमेदवारासाठी अर्जाचा नमुना क्र.२०, कागदपत्रांबाबत शपथपत्राचा नमुना क्र.२१, वंशावळीबाबत शपथपत्राचा नमुना क्र.३, जिल्हाधिकारी / जिल्हा निवडणुक अधिकाऱ्याचे निवडणुकीबाबत प्रमाणपत्र, इत्यादि सर्व नमुने डाउनलोड करण्यासाठी वर दिलेल्या CCVIS Website या लिंकवर क्लिक करावे.

४) इतर कारणासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र हवे असल्यास – विहित नमुन्यातील अर्ज भरावा, त्यावर आपला फोटो लावावा. त्यासोबत ज्या आस्थापन /संस्थेकडुन लाभ मिळणार आहे त्यांचे प्रमाणपत्र घ्यावे. अर्जासोबत वर सांगण्यात आलेली आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावीत. इतर कारणासाठी अर्जाचा नमुना क्र.२२, कागदपत्रांबाबत शपथपत्राचा नमुना क्र.२३, वंशावळीबाबत शपथपत्राचा नमुना क्र.३, ज्या आस्थापन /संस्थेकडुन लाभ मिळणार आहे त्यांचे प्रमाणपत्र, इत्यादि सर्व नमुने डाउनलोड करण्यासाठी वर दिलेल्या CCVIS Website या लिंकवर देण्यात क्लिक करावे.

विद्यार्थी, शासकीय सेवेतील कर्मचारी, निवडणुकीत आरक्षित जागेवर उभे असणारे उमेदवार किंवा इतर कारणासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असणाऱ्यांनी वर दिल्याप्रमाणे आपल्या विहित नमुन्यातील अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडून आपला अर्ज जिल्हा जात पडताळणी समितीच्या कार्यालयात जाऊन स्वतः दाखल करावा. विहित शुल्क जमा करुन अर्ज दाखल केल्याचे टोकन / पोचपावती घ्यावी. कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे टोकन / पोचपावती जपून ठेवावी.

जिल्हा जात पडताळणी समिती कार्यपद्धती

१) समितीला आपला अर्ज प्राप्त झाल्यानंतर समिती संबंधित अर्जात भरलेली माहिती, जोडलेली कागदपत्रे आणि शपथपत्रे विहित पद्धतीत आहे का नाहीत, कायमस्वरुपी वास्तव्य, जातीचे पुरावे, वंशावळ, प्रमाणपत्रे यांची सखोल छाननी करते. कागदपत्रांच्या सत्यतेबाबत खात्री पटल्यास इतर कोणतीही चौकशी न करता समिती अर्जदाराला कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र वितरित करते.

२) अर्जात त्रुटी किंवा कागदपत्रे अपुर्ण असतील तर समितीकडून त्याबाबत अर्जदाराला कळविण्यात येते.

३) समितीला छाननीमध्ये अर्जदाराच्या कागदपत्रांची खातरजमा होत नसेल, तर समिती सदर प्रकरण अधिक चौकशीसाठी दक्षता पथकाकडे पाठवते.

४) दक्षता पथक अर्जदाराने अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांच्या अनुषंगाने अर्जदाराचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी किंवा घरी जाऊन रहिवाशांकडे, कुटुंबीयांकडे गृहचौकशी व शालेय चौकशी करते. जातीच्या प्रथा, रुढी, परंपरा, देवदेवता, जन्ममृत्यु व विवाह विधी याबाबतही चौकशी करुन साक्षीपुरावे व जबाब नोंदवले जातात. दक्षता पथकाला गरजेचे वाटल्यास ते अर्जदाराने संबंधित कागदपत्रे ज्या कार्यालयांतुन प्राप्त केली, त्या कार्यालयात जाऊन कागदपत्रांच्या सत्यतेविषयी खात्री करते. त्यानंतर आपला अहवाल तयार करुन जात पडताळणी समितीला पाठवला जातो. या अहवालाचा अभ्यास करुन समिती अर्जदाराच्या अर्जावर निर्णय घेते.

५) दक्षता पथकाच्या अहवालावरुनही खात्री न पटल्यास समिती अर्जदाराला कारणे दाखवा नोटीस पाठवुन जातीचा दावा सिद्ध करण्यास सांगते. सोबत दक्षता पथकाचा अहवालही पाठवते. त्यानंतर अर्जदाराच्या अर्जावर सुनावणी घेतली जाते. त्यात अर्जदाराची मुलाखत घेतली जाते किंवा त्याच्या वकीलामार्फत अर्जदाराचे म्हणणे लेखी व तोंडी नोंदवुन घेतले जाते. अर्जदाराचा अर्ज, त्याने सादर केलेली कागदपत्रे, दक्षता पथकाचा अहवाल, सुनावणीवेळी दिलेले लेखी व तोंडी म्हणणे आणि संदर्भासाठी तत्सम विविध न्यायनिवाडे, निकाल यांचा आधार घेऊन समिती आपला अंतिम निर्णय देते. सदर निर्णयही अर्जदाराला मान्य नसल्यास त्याला फक्त मुंबई उच्च न्यायालयात याविषयी अपील करता येते. या अपीलावर एका महिन्यात निर्णय दिला जातो.

आपणास कुणबी दाखला कसा काढावा आणि कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढावे याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी अनेक संदर्भांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्या संदर्भातून सारांश रूपाने ही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आपणास ही माहिती कशी वाटली हे नक्की कळवा. वरची माहिती बारकाईने वाचल्यास शक्यतो आपणास प्रश्न पडणार नाहीत. तरीही आपणास काही प्रश्न असतील किंवा या माहितीत भर घालण्यासाठी आपणाकडे काही सूचना असतील तर खाली दिलेल्या व्हाट्सअप क्रमांकावरती मेसेज करुन कळवा. 

आपला समाजबांधव अनिल माने, पुणे : 9096207033.

(कृपया आपणास लेख इतर ठिकाणी छापायचा असल्यास पूर्वपरवानगी घ्यावी.)

Leave A Reply

Your email address will not be published.