छत्रपती शिवरायांचे मराठी भाषाविषयक धोरण

0

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने खास लेख

आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ एका धर्माचे, एका जातीचे, एका राज्याचे किंवा एका भाषेच्या लोकांचेच नेतृत्व म्हणुन संकुचित करण्याचे अनेक प्रयत्न झाले. परंतु शिवरायांचे चरित्र इतके तेजस्वी आहे की त्यांचे व्यक्तिमत्व अशा संकुचित चौकटीत कधीच बंदिस्त होऊ शकले नाही. म्हणुन तर जगातील अनेक राष्ट्रात शिवरायांची जयंती आज मोठ्या आनंदाने साजरी होत आहे. शिवरायांचे व्यक्तिमत्व संकुचित नसुन ते व्यापक असल्याचं यातुन दिसुन येतं.

आपल्या गौरवशाली संस्कृतीचा अभिमान बाळगताना शिवरायांनी इतरांच्या संस्कृतीचा कधी अवमान केला नाही. महाराजांच्या मराठी भाषा विषयक धोरणातुन हे दिसुन येतं.

शिवरायांना आपल्या मराठी मातृभाषेचा अभिमान होता, याबद्दल कुणाचेच दुमत नाही. परंतु महाराजांचा अभिमान हा आंधळा नव्हता. महाराजांच्या भाषाविषयक धोरणांचे काही पैलु आपण पाहुया.

१) राज्यकारभारात शत्रुचे डावपेच जाणुन घ्यायचे असतील तर शत्रुची भाषा माहीत असावी लागते, हे महाराजांना चांगलेच माहीत होते. म्हणुनच महाराजांनी मराठी सोबत फारसी, अरबी, संस्कृत, इत्यादी भाषा शिकल्या.

शिवरायांची गारद आणि तिचा संपुर्ण अर्थ

२) शिवरायांचे मराठीविषयक धोरण हे भाषावादाचे नव्हते. जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर अनेक भाषा अवगत असल्या पाहिजेत हा त्यांच्या धोरणाचा गाभा होता.

३) शिवरायांनी आपले पुत्र संभाजीराजेंना अनेक भाषा शिकता येतील अशी व्यवस्था केली. म्हणुनच शंभुराजे इक संस्क्रुत आणि तीन ब्रज हिंदी असे चार ग्रंथ लिहु शकले. शंभुराजांची इंग्रजी भाषेवरही पकड होती.

४) आपल्या राज्यकारभारात दैनंदिन व्यवहारातील भाषेतसुद्धा फारसी, अरबी भाषांचा वापर वाढल्याचे महाराजांच्या लक्षात आले. लोकांनी तर आपल्या मुलांची नावेसुद्धा रुस्तुमराव, सुल्तानराव ठेवायला सुरुवात केली होती. यावर उपाय म्हणुन राज्यव्यवहारात आढळुन येणाऱ्या फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द शोधुन त्याचा एक कोश तयार करावयाची योजना शिवाजी महाराजांनी आखली.

५) आपली राज्यकारभाराची भाषा सर्वसामान्य रयतेलाही समजावी आणि मराठीवरील इतर भाषेतील शब्दांचा वापर कमी होऊन मराठी शब्दांचा वापर वाढवा यासाठी महाराजांनी आपल्या राज्याभिषेका प्रसंगी रघुनाथपंत हणमंते यांना मराठी राजव्यवहार कोष निर्माण करण्याची आज्ञा केली.

६) महाराजांनी त्यांच्या काळात मराठीला राजभाषेचे स्थान प्राप्त करुन दिले. बखरी, संस्कृत ग्रंथांची भाषांतरे यांच्याबरोबरच राजव्यवहारकोश, मराठी शब्दकोश अशा भाषाविषयक उपक्रमांचा आरंभ शिवशाहीत झालेला दिसतो.

७) महाराजांचे भाषेच्या संदर्भातले मोठेपण हे की मराठी व्यवहार-भाषा अरबी-फार्सी यामध्ये जी गुदमरुन जाणार होती तो धोका शिवाजी महाराजांनी तिला राजभाषा केल्यामुळे टळला. महाराजांच्या कार्याचा परिणाम म्हणुन पुढे इंग्रजी राजवटीतही मराठा संस्थानांमध्ये शासनाच्या आश्रयाने ग्रंथनिर्मिती झालेली दिसुन येते.

८) मराठीच्या अभिमानापोटी महाराजांनी इतर भाषांचा अनादर महाराजांची कधीच केला नाही. याउलट शिवरायांच्या पत्रात अरबी, फार्सी भाषेचा (शब्दांचा) त्यांनी मोठ्या प्रमाणात वापर केलेला दिसुन येतो.

९) महाराजांच्या आज्ञेनुसार सुमारे १००० पेक्षा अधिक शब्दांचा एक राजव्यवहारकोश तयार झाला. आपली संस्कृती जपली जावी या उद्देशाने महाराजांनी हा कोश रचला. असा कोश रचनारे शिवराय हे पहिले कोशकार ठरतात.

१०) शिवकाळात भाषावाद अस्तित्वात नव्हता. आजच्या राजकारण्यांनी राजकीय लाभासाठी भाषावाद उभा केलेला असुन मराठी भाषेच्या अस्मितेचे प्रतिक म्हणून शिवरायांची प्रतिमा उभी केली जाते. हा विरोधाभास आहे.

११) महाराजांनी आपल्या अनेक गडकिल्ल्यांची दिलेली नावे, सरदारांना दिलेल्या पदव्या या मराठीत आहेत.

१२) महाराजांचं चलन “शिवराई” यावर सुद्धा त्यांनी “राजा शिवछत्रपती” अशी मराठी अक्षरे कोरलेली आहेत.

१३) शिवरायांनी मराठी भाषेच्या रक्षणासाठी किंवा संवर्धनासाठी जी पावले उचलली तशा प्रकारचे प्रयत्न न करता केवळ इतर भाषांविषयी अविश्वासाचे वातावरण निर्माण करणारे राजकारणी लोक महाराजांचे धोरण विसरले आहेत असेच म्हणावे लागेल.

© लोकराज्य टीम.

Leave A Reply