तिरंगा राष्ट्रध्वज शिवरायांच्या प्रमुख गडकिल्यांवर का उभारला जातो ?

दिल्लीच्या लाल किल्ल्यानंतर देशात रायगडावरील ध्वजस्तंभाला दुसरा मान दिला जातो.

रायगड वरील तिरंगा राष्ट्रध्वज

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे आपल्या देशाचे राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात. तसेच १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. यादिवशी सर्व सरकारी कार्यालये तसेच शाळा कॉलेजमध्ये तिरंगा राष्ट्रध्वज उभारण्यात येतो. राष्ट्रध्वज उभारल्यानंतर सर्वजण त्याला सलामी देऊन “विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा उंचा रहे हमारा..” हे ध्वजगीत गात असतात. लहानपणापासून आपण हे चित्र पाहत आलो आहोत. अलीकडच्या काही दशकांत याचदिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमुख गडकिल्ल्यांवर देखील तिरंगा राष्ट्रध्वज उभारण्यात आल्याच्या बातम्या आपण कुठे न कुठे नक्कीच पाहिल्या असतील. गडकिल्ल्यांवर तर कुठले सरकारी कार्यालय किंवा शाळा कॉलेज नसतात, तरी देखील गडकिल्ल्यांवर तिरंगा राष्ट्रध्वज उभारण्यामागचे कारण नक्की काय आहे ? चला तर आज आपण हेच कारण जाणून घेणार आहोत…

शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर तिरंगा राष्ट्रध्वज का उभारला जातो ?

छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणुन ओळखले जाते. महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा अविभाज्य भाग असणाऱ्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये गडकिल्ल्यांची उभारणी करुन महाराजांनी सर्वसामान्य रयतेचे स्वराज्य स्थापन केले. रयतेला स्वातंत्र्य आणि लोकशाही मुल्यांची ओळख ही शिवरायांनीच करुन दिली. शिवरायांच्या काळात स्वराज्याचे गडकिल्ले म्हणजे एकप्रकारे त्या काळातील प्रशासकीय केंद्रेच होती. शिवरायांचे गडकिल्ले म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहेत. आपल्या देशाचा ते राष्ट्रीय वारसा आहेत. मात्र गडकिल्ल्यांवर ट्रेकिंग करणाऱ्या लोकांखेरीज कुणाचेही त्यांच्याकडे लक्ष नसते ही खेदाची बाब आहे. या गडकिल्ल्यांना मानाचे स्थान प्राप्त व्हावे असे प्रत्येकालाच वाटते. जाणुन घेऊया शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांवर उभारण्यात येणारा तिरंगा आणि त्याच्याबद्दलच्या अपरिचीत गोष्टी…

गडकिल्ल्यांचा हा ऐतिहासिक वारसा जपताना इतिहासातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना योग्य तो मान मिळावा यादृष्टीने एप्रिल २०१४ मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने शिवरायांच्या गडकिल्ल्यांवरही तिरंगा राष्ट्रध्वज उभारण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार महाराष्ट्र दिन (१ मे) या दिवशी शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांवर तिरंगा राष्ट्रध्वज उभारणे अनिवार्य करण्यात आले आहे. (शासननिर्णय पहा). प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) आणि स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) हे राष्ट्रीय सण असल्याने या दिवशी देखील गडकिल्ल्यांवर तिरंगा राष्ट्रध्वज उभारणे बंधनकारक आहे. ऐतिहासिक गडकिल्ल्यांमध्ये

किल्ले रायगड, सिंहगड, शिवनेरी, पुरंदर, वसई, प्रतापगड, दौलताबाद, सीताबर्डी येथे राष्ट्रध्वज उभारावा, असे शासनाचे आदेश आहेत.

ते दरवर्षी पाळले जातात. संबंधित गडकिल्ले ज्या प्रशासकीय कार्यालयाच्या प्रदेशात येतात, त्या प्रशासकीय कार्यालयावर सदर गडकिल्ल्यांवर राष्ट्रध्वज उभारण्याची जबाबदारी असते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन म्हणजेच ६ जून १६७४ हा भारतीयांच्या दृष्टीने पहिला स्वातंत्र्यदिन मानला जातो. किल्ले रायगडावर भारताच्या स्वातंत्र्याची ज्योत पेटली आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचा शेवट होऊन भारत देश सार्वभौम स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला. त्यामुळेच किल्ले रायगड येथील ध्वजस्तंभ हा दिल्लीतील लाल किल्ल्याच्या ध्वजस्तंभानंतर देशातील मानाचा दुसरा ध्वजस्तंभ म्हणुन समजला जातो. आपल्याला हा ध्वजस्तंभ रायगड किल्ल्यावरील नगारखान्याच्या समोर पहायला मिळतो. २६ जानेवारी २०१६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त किल्ले रायगड येथे महाड तहसिल कार्यालाकडुन उभारण्यात आलेला राष्ट्रध्वज हा दिल्लीच्या लाल किल्ला नंतरचा भारतातील दुसरा सर्वात मोठा राष्ट्रध्वज होता. त्याचा आकार “२४ x १६ फुट” असा होता.

 

शिवनेरी, विजयदुर्ग, वसई आणि देवगिरी किल्ल्यावरील तिरंगा राष्ट्रध्वज

 

राज्य शासनाच्या निर्णयानुसार राष्ट्रध्वज उभारण्याचा कार्यक्रम सर्व शासकीय कार्यालये आणि गडकिल्ल्यांवर एकाच वेळी म्हणजे सकाळी ९:०५ वाजता करण्यात येतो. सर्व गडकिल्ल्यांवरच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देताना जन-गण-मन हे राष्ट्रगीत वाजविण्यात येते. गडकिल्ल्यांवर ध्वजारोहण करण्यापुर्वी राष्ट्रध्वज चांगल्या स्थितीत असल्याची दक्षता घेण्यात येते. तसेच त्याची रंगीत तालीम घेतली जाते. गडकिल्ल्यांवरील राष्ट्रध्वज सूर्यास्तापुर्वी उतरवला जातो. तसेच राष्ट्रध्वज उतरवण्याआधी वंदे मातरम हे राष्ट्रगाण गायले जाते. शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांवर भारताचा तिरंगा राष्ट्रध्वज आणि शिवरायांचा भगवा ध्वज एकत्र फडकताना पहायला मिळणं ही खरोखर भाग्याची गोष्ट असते. गडकिल्ल्यांवरील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी अनेक गडकिल्लेप्रेमी, शिवप्रेमी व लोक आवर्जुन उपस्थित राहतात. आपल्यालाही संधी मिळाली तर आपणही या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहण्याचा प्रयत्न करा.

शब्दांकन : लोकराज्य टीम

Leave A Reply

Your email address will not be published.