राज्याभिषेक करण्यासाठी शिवरायांनी 6 जुन हाच दिवस का निवडला ?

शिवराज्याभिषेक

“ काळजा काळजात एकच धुन
चलो राजधानी रायगड ६ जुन ”

शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी या ओळी हमखास आपल्या कानावर पडतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन महाराष्ट्रामध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या सोहळ्याला आता लोकोत्सवाचे स्वरुप प्राप्त व्हायला लागले आहे.

महाराष्ट्र सरकारनेही स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये स्वराज्यगुढी उभी करून शिवराज्याभिषेक दिन हा “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करण्याचा शासननिर्णय जारी केला आहे. सरकारी कार्यालयांमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा करावयाची नियमावली पुढीलप्रमाणे :

१) भगवा स्वराज्यध्वज संहिता

ध्वज हा उच्च प्रतीचे सॅटीन असलेली भगवी जरी पताका असावी. ध्वज हा ३ फुट रुंद आणि ६ फूट लांब या प्रमाणात असावा म्हणजेच लांबी ही रुंदी पेक्षा दुप्पट असावी. ध्वज हा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, शिवमुद्रा, वाघनखे ह्या शिवरायांच्या पंच शुभचिन्हांनी अलंकृत असावा.

२) शिवशक राजदंड स्वराज्यगुढी संहिता

शिवशक राजगंडाचे प्रतीक म्हणून कमीतकमी १५ फुट उंचीचा वासा किंवा बांबु असावा. त्याच्यावर सुवर्ण आणि लाल कापडाची गुंडाळी असावी. राजदंड सरळ उभा करण्यासाठी त्याला किमान ५ ते ६ फुटाचा आधार द्यावा.

आवश्यक साहित्य

सुवर्ण कलश, पुष्पहार, गादी, आंब्याची डहाळी, अष्टगंध, अक्षता, हळद, कुंकु, ध्वनीक्षेपक.

३) ६ जुन रोजी सकाळी ९ वाजता

शिवशक राजदंडावर भगवा स्वराजध्वज बांधुन घ्या. शिवरायांनी सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करुन स्वराज्याचा सार्वभौम मंगल कलश रयतेच्या झोळीमध्ये रिता करुन रयतेची झोळी सुख, समृद्धी, समता व स्वातंत्र्याने भरली म्हणून शिवशक राजगंडाच्या वर रयतेच्या झोळीत सार्वभौमत्व रिता करणारा “सुवर्ण कलश” बांधावा. त्यावर शिवशक राजदंड स्वराज्यगुढी हे अष्टगंधाने लिहुन त्यावर अक्षता लावाव्यात. नंतर पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी बांधावी व शिवरायांच्या जयघोषात शिवशक राजदंड स्वराज्यगुढी सरळ उभी करावी. तदनंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत म्हणुन सांगता करावी.

४) सुर्यास्ताला

शिवशक राजदंड स्वराज्यगुढी खाली घ्यावी. भगवा स्वराज्यध्वज व्यवस्थित घडी करुन ठेवून द्यावा.

संदर्भ : १) शासननिर्णय २) परिपत्रक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी राजधानी रायगडावर दरवर्षी लाखोंच्या संख्येने शिवप्रेमी मावळे हजेरी लावत असतात. शिवराज्याभिषेक सोहळ्याला शिवप्रेमींच्या दृष्टीने सणाप्रमाणेच महत्व असल्याने या सोहळ्याच्या तयारीला त्यांच्याकडून दोन-चार महिने अगोदरपासुनच सुरुवात केली जाते. मात्र इतिहासामध्ये प्रत्यक्षात ज्यावेळी महाराजांचा राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी तो सोहळा ६ जुन याच दिवशी का केला गेला असेल ? ६ जूनला राज्याभिषेक करवुन घेण्यामागे महाराजांची काय दुरदृष्टी होती ? असे प्रश्न अनेक शिवप्रेमींना पडतात.

राज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवरायांनी ६ जुन हाच दिवस का निवडला ?

१) छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तृत्वाची आणि स्वराज्याची जाणीव आलम दुनियेला व्हावी, त्याचसोबत मोगलांनाही ह्या देशामध्ये एका स्वतंत्र स्वाभिमानी स्वराज्याची स्थापना झाली आहे हे कळावे यासाठी कोणत्याही शुभ-अशुभ अशा मुहुर्ताची वाट न बघता महाराजांनी जाणीवपुर्वक ६ जुन हा दिवस राज्याभिषेक करण्यासाठी निवडला. त्यांनी मोगलांना त्यांच्या ढासळत्या डोलाऱ्याची जाणीव करुन दिली. त्यांनी मोगलांचा तिळपापड केला.

२) महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्यास त्याकाळी धर्मविधी करणाऱ्या सर्वच पुरोहीत वर्गाने जाहीर विरोध केला होता. महाराज वैदिक धर्मानुसार शुद्र असल्यामुळे राज्याभिषेक करण्यासाठी पात्र नाहीत असा निष्कर्ष त्यांनी काढला होता. त्यामुळे महाराजांनी काशीच्या गागाभटाला भरपुर द्रव्य देऊन त्याच्याकडुन राज्याभिषेक करुन घेतला आणि विरोध करणाऱ्या पुरोहित वर्गाला धडा शिकवला.

३) ६ जुन हा मृग नक्षत्राचा आदला दिवस. कृषी संस्कृतीशी जवळचा दिवस. आपल्याकडे मृग नक्षत्र साधारणतः ७ जुनला सुरु होते. सहसा त्यात बदल होत नाही. महाराष्ट्रात कोकणासह सगळीकडे शेतकऱ्यांच्या पेरण्या प्रामुख्याने मृग नक्षत्रात सुरु होतात. म्हणजेच शेतीची कामे ७ जुननंतर सुरु होतात. शेतकरी रयतेला विनासायास महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पाहता यावा आणि त्यांच्यासाठी तो एक आनंदाचा क्षण ठरावा, असा विचार करून महाराजांनी त्याकाळी रोहीणी व मृग नक्षत्राचा जोड दिवस असणारा ६ जुन हा दिवस निवडला.

४) ६ जुन १६७४ रोजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला, त्यावेळी किल्ले रायगडवरचे वातावरण चांगले होते. उन्हाळा आणि पावसाळा यांच्यामधील तो संक्रमणकाळ. आकाश निरभ्र होते. ऊनही कमी झालेले होते. पाऊस नव्हता. असे वातावरण शेतकऱ्यांना सुद्धा सोयीचे होते. हे सुध्दा हा दिवस निवडण्यामागचे महत्वाचे कारण होते.

५) जर महाराजांनी ज्योतिषाचा सल्ला घेतला असता ज्योतिषांनी त्यांना ऑक्टोबर ते जानेवारी हा काळ सांगितला असता. कारण पंचांगातील दक्षिणायण-उत्तरायण ही भानगड. परंतु महाराजांना त्यावेळी वेगेवेगळ्या शत्रुंच्या हालचालींवर लक्ष देणेही तितकेच आवश्यक होते. राज्याभिषेक सोहळ्याला कुठल्याही शत्रुचा अडसर व्हायला नको होता. लोक दक्षिणायण वर्ज्य मानतात. परंतु महाराज आवर्जुन दक्षिणायणातील जुन महिना निवडतात, कारण शत्रुला चकमा देण्यासाठी तेच योग्य होते. राज्य राहिले तरच राज्याभिषेक सोहळा व्यवस्थित होईल. म्हणुन अगोदर राज्य आणि रयत ह्यांची काळजी घेऊन महाराजांनी हा दिवस निवडला.

६) मुहुर्त, पंचांग आणि योग्य संधी याचा काहीही संबंध नसतो हे महाराजांनी आपल्या अनेक मोहिमांतुन दाखविले होते. राज्यभिषेक या महाराजांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या प्रसंगीही त्यांनी हीच गोष्ट सिद्ध करुन दाखविली.

७) ६ जुन हा दिवस निवडण्यामागे आणखी एक मोठा राष्ट्रीय उद्देश होता. मोगल बादशहा औरंगजेब याचा सिंहासनरोहणाचा खास कार्यक्रम ५ जुन १६५९ या दिवशी झाला होता. त्यामुळे “आता तुमच्या मोगलाईचा अस्त होऊन स्वराज्याच्या स्वातंत्र्याचा सूर्य दक्षिणेकडील क्षितीजावर उगवलेला आहे” हे औरंगजेबाला दाखवुन देण्यासाठी महाराजांनी ५ जुनच्या मध्यरात्रीपासुनच राज्यभिषेक प्रक्रिया सुरु करुन ६ जुन १६७४ रोजी किल्ले रायगडावर राज्यभिषेक केला. जगातील सर्वात बलाढ्य सत्ताधीशाला सह्याद्रीच्या रणमर्दाने दिलेला तो एक इशाराच होता.

महाराजांच्या राज्याभिषेकाची बातमी ऐकल्यानंतर औरंगजेब त्यावेळी हताशपणे उद्गारला,
“या खुदा, अब तो हद हो गई | तु भी उस सिवा के साथ हो गया | सिवा ‘छत्रपती’ हो गया |”

छत्रपती शिवराय यांच्याकडे दुरदृष्टी होती, म्हणुनच त्यांनी राज्याभिषेक करण्यासाठी हा दिवस निवडला. तारीख-तिथी वाद करण्यापेक्षा सर्व शिवप्रेमींनी शिवरायांच्या नजरेतुन या सोहळ्याकडे पहावे. या दिवसाला राष्ट्रीय सणाचे महत्व कसे प्राप्त होईल यासाठी प्रयत्न करावेत. जय शिवराय.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि तिचा अर्थ आपणास माहित आहे का ?