छत्रपती संभाजी महाराजांवरील आरोपांची सप्रमाण चिरफाड

0

मराठयांच्या गौरवशाली इतिहासातील सुवर्णअध्याय म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. आपल्याला लाभलेल्या उण्यापुऱ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जगातील सर्वात बलाढ्य सत्ताधीश औरंगजेबाची स्वप्ने धुळीला मिळवुन आपले कर्तृत्व सिद्ध केले होते. त्यांच्या शौर्य आणि हौतात्म्यातुन हा देश उभा राहिला आहे.

अशा महान राजाचे चरित्र विकृत इतिहासकार, नाटककार, कादंबरीकार आणि चित्रपटवाल्यांनी बदनाम करण्याचा खुप प्रयत्न केला, परंतु सगळ्या आरोपांच्या भट्टीतुन तावुन सुलाखुन शंभुचरित्र तितक्याच तेजाने तळपत आज आपल्या समोर आले आहे. इतिहासाच्या पुनर्मांडणीची गरज असते ती यासाठी. या पुनर्मांडणीतुनच संभाजी महाराजांचे चरित्र निष्कलंक असल्याचे सिद्ध झाले. या मांडणीचा प्रसार सर्वसामान्य शिवशंभुप्रेमींपर्यंत व्हायला हवा. त्यासाठी संभाजी महाराजांवरील आरोप आणि त्यांचे खंडन आपल्यासमोर आणत आहोत.

आरोप १) संभाजी महाराज आणि बदफैलीपणा

छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रभावशाली व्यक्तिमत्वाला बदनाम करण्यासाठी त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न झाला. ही बदनामी होण्यासाठी कारणीभुत ठरली ती मल्हार रामराव चिटणीसाची बखर. वास्तविक बखरीला इतिहास मानता येत नाही. परंतु शंभुराजांच्या मृत्युनंतर १२२ वर्षांनी उत्तर पेशवाईच्या काळात रचलेल्या या बखरीत शंभुराजांना जितके बदनाम करता येईल तितके करण्याचा प्रयत्न झालेला दिसुन येतो. “कोण्हे एके दिवशी संभाजी महाराजांनी रायगडावर कोण्ह्या एका रुपवान स्त्री वर बलात्कार केला आणि शिवराय शिक्षा करतील या भीतीने दिलेरखानाला जाऊन मिळाले” अशा प्रकारची काल्पनिक मांडणी चिटणीसाने त्यात केली आहे. त्यानंतर शंभुराजांवर निघालेल्या कथा, कादंबऱ्या, नाटके, चित्रपट या सगळ्यांवर या बखरीचा प्रभाव पडला आणि त्यांनीही संभाजी महाराजांचे चरित्र अतिरंजितपणे समोर आणले.

वास्तविक ज्या रायगडावर ही घटना घडल्याचे चिटणीस सांगतो, त्या रायगडावर शंभुराजे नव्हतेच, त्यांचा मुक्काम पावणेदोन वर्षे दक्षिण कोकणात शृंगारपुरला होता. ते सज्जनगडवरुन दिलेरखानाकडे गेले होते, रायगडावरुन नाही. त्यांचे दिलेरखानाकडे जाणे ही सुद्धा शिवरायांचीच खेळी होती. चिटणीस सदर घटना कधीची, त्याला कुठुन कळली, ती स्त्री कोण वगैरे याबद्दल काहीही सांगत नाही. उलट चिटणीसाच्या खापर पणजोबा बाळाजी आवजी चिटणीसला शंभुराजांनी राजद्रोहाची शिक्षा म्हणुन हत्तीच्या पायाखाली दिले होते, याचा राग धरुन त्याने संपुर्ण बखरीत शंभुराजांविषयी द्वेष ठासुन भरलेला आहे हे सिद्ध होते.

आरोप २) संभाजी महाराज आणि स्त्रीलंपटपणा

छत्रपती संभाजी महाराजांवर जिजाऊ-शिवरायांचे संस्कार होते. त्यांनी स्त्रियांना सन्मानाने वागवले होते. आपल्या पत्नीला राज्यकारभाराचे अधिकार देणारा, तिच्याशी एकनिष्ठ असणारा राजा स्त्रीलंपट असु शकत नाही. परंतु चिटणीस बखरीच्या प्रभावाखाली येऊन अनेक इतिहासकारांनी महाराजांना स्त्रीलंपट ठरवले. काही काल्पनिक स्त्री पात्रे त्यांच्या चरित्रात जोडली.

१) गोदावरी – गोदावरी नावाचे कोणतेही पात्र अस्तित्वात नसताना गोदावरी ही अण्णाजी दत्तोची कन्या होती आणि तिच्यावर शंभुराजांनी बलात्कार केल्यामुळे तिने आत्महत्या केली असे सांगितली जाते. पण अण्णोजी दत्तोला गोदावरी नावाची मुलगीच नव्हती. आज रायगडाच्या पायथ्याला गोदावरीची जी समाधी दाखवली जाते ती गोदावरीची नसुन माधवराव पेशवे यांच्या यशोदाबाई पेशवे यांची आहे. लोकांना माहीत नसणारी समाधी गोदावरीची आहे, असा अपप्रचार करुन आजपर्यंत संभाजीराजांची बदनामी करण्यात आली.

२) थोरातांची कमळा – कमळा नावाच्या कोणत्याही स्त्रीला संभाजीराजांच्या जीवनात आणि चरित्रात स्थान नाही. ऐतिहासिक पुरावा नाही. बी नावाच्या कवीने “कमळा” नावाचे दिर्घकाव्य लिहुन या तथाकथित स्त्रीला साहित्यात प्रसिद्धी दिली आहे. त्यानंतर १९४१ मध्ये त्यांच्या “थोरातांची कमळा” या चित्रपटाने तिला सामान्य जनतेपर्यंत पोचविले. १९५१ मध्ये ना.के.सोनसुखार यांचे “थोरातांची कमळानाटक आले. १९६५ मध्ये राजा बढेंनीरायगडचा राजबंदी” नाटकात गोदावरीला प्राधान्य दिले. थोरातांच्या कमळावर संभाजी राजांनी जबरदस्ती केली आणि त्याचा आघात सहन झाल्यामुळे कमळाने आत्महत्या केली, अशी या सर्व साहित्य, नाटके, चित्रपटांची मांडणी आहे.

पन्हाळगडाच्या पायथ्याशी या कमळेची समाधी दाखवली जाते. त्या समाधीवर कमळाच्या निधनाचे साल १६९८ दाखवले आहे. मात्र शंभुराजांचे निधन त्याआधी नऊ वर्षे म्हणजे १६८९ मध्येच झाले होते. शोध घेतल्यानंतर लक्षात आले की पन्हाळा गडावरची दाखवण्यात आलेली ती समाधी कमळेची नसुन बाळाजी विश्वनाथ भट यांच्या फौजेशी लढताना धारातीर्थी पडलेल्या यशवंतराव थोरात व तिथेच सती गेलेल्या त्यांच्या पत्नी गोडाबाई थोरात या दांपत्याची आहे. शंभुराजांची बदनामी करण्यासाठी काल्पनिक कमळा पात्र निर्माण करुन थोरातांच्या समाधीचा गैरवापर केला गेल्याचे सिद्ध होते.

३) तुळसा – तुळसा नावाची स्त्री सुद्धा संभाजीराजांच्या काळात अस्तित्वात नव्हती. तुळसा हे पात्र कोणत्याही ऐतिहासिक साधनात सापडत नाही. नाटककार आत्माराम पाठारे यांच्या यांनी “संगीत श्री छत्रपती संभाजी” या नाटकात तिला जन्म दिला. १९२२ मध्ये राम गणेश गडकरींनी “राजसंन्यास” नाटकात तुळसा पात्र प्रसिद्ध केले. या नाटकात संभाजी महाराजांच्या तोंडी अतिशय अश्लील संवाद घातले. १९२३ मध्ये वि.वा.हडप यांनी “राजसंसार” नाटकात तिला प्रसिद्ध केले. केवळ नाटकाच्या प्रसिद्धीसाठी काल्पनिक तुळसा नावाचे पात्र निर्माण करुन तिला इतिहासात स्थान देऊन महाराजांची बदनामी केली गेली.

४) झेबुन्निसा/झिअतुन्निसा – या औरंगजेबाच्या कन्या होत्या. संभाजीराजांची बदनामी करण्यासाठी बखर नाटककरांनी यांचाही वापर केला. पण संभाजीराजांचा आणि झेबुन्निसा/झिअतुन्निसाचा कसलाही संबंध नव्हता. झिअतुन्निसा ही संभाजीराजांपेक्षा १४ वर्षांनी मोठी तर झेबुन्निसा ही १९ वर्षांनी मोठी होती. त्यांनी एकमेकाला कधीही पाहिले नाही. आग्राभेटीप्रसंगी पाहिले होते तेव्हा शंभुराजे फक्त ९ वर्षांचे होते. औरंगजेबाने शंभुराजांना कैद केल्यानंतर मुस्लिम धर्म स्विकारण्याच्या बदल्यात शंभुराजांनी औरंगजेबाकडे मुलीशी लग्न करण्याची मागणी केल्याचा खोटा इतिहास तयार केला.

आरोप ३) संभाजी आणि महाराज व्यसन

छत्रपती शिवराय जसे निर्व्यसनी होते तसेच शंभुराजे सुद्धा निर्व्यसनी होते. शंभुराजांनी गोव्यात पोर्तुगीजांना पराभुत केल्यानंतर त्यांनी शंभुराजांशी तह केला. त्या तहाद्वारे दोन पिंप दारु शंभुराजांना देण्याचा करार झाला. ती दोन पिंप दारु ही तोफेची दारु होती. पिण्याची दारु नाही. परंतु खाफीखानाच्या फारशी ग्रंथातील “सत्तामदाचा कैफ” या शब्दाचे भाषांतर ग्रँट डफने “Intoxicated with the wine of fully and pride” असे केले आणि आमच्याकडच्या इतिहासकारांनी त्याचा अर्थ दारुडे असाच घेतला. त्यामुळे री ओढणाऱ्या इतिहासकारांनी शंभुराजांना दारुडे ठरविण्याची संधी सुद्धा सोडली नाही.

आरोप ४) संभाजी महाराज आणि शिवरायांवर विषप्रयोग

यापुर्वीच्या आरोपांपेक्षा हा आरोप भयानक आहे. मुंबईकर इंग्रज बातमीदाराने सुरतेला पाठविलेल्या एका पत्रात “संभाजीने रात्री ब्राह्मण अधिकाऱ्याच्या मुलीला भेटण्यासाठी गडाखाली जायचे न सोडल्यास त्याचा कडेलोट करा, असा शिवरायांनी हुकुम दिला म्हणुन शंभुराजांनी त्यांच्यावर विषप्रयोग केला” असा आरोप केलेला आहे. मुळात ज्या कारणासाठी हा विषप्रयोग केल्याचे सांगितले आहे तो गोदावरी नामक प्रकारच काल्पनिक आहे. डॉ.जयसिंगराव पवारांनी हा आरोप सप्रमाण खोडुन काढला आहे.

आरोप ५) संभाजी महाराज आणि सोयराबाई

सोयरबाईंनीच शिवरायांना विष दिल्याचा राग मनात धरुन संभाजी महाराजांनी सोयराबाई महाराणींना भिंतीत चिणुन मारले असा हा मल्हार रामराव चिटणीसाच्या विकृत डोक्यातुन बाहेर आलेला आरोप आहे. वास्तविक चिटणीस सांगतो ती घटना झाल्याच्यापासुन सोयराबाई एक वर्ष जिवंत होत्या. ऑगस्ट १६८० मध्ये शंभुराजे सोयराबाईंबद्दल “स्फटिकप्रमाणे निर्मळ मनाची माता” असे उद्गार काढतात. यावरुन हा आरोप किती काल्पनिक आहे ते सिद्ध होते.

आरोप ६) संभाजी महाराज आणि शिर्क्यांचे शिरकाण

चिटणीस बखरीतील हा अजुन एक द्वेषपुर्ण आरोप. संभाजी महाराजांविरुद्ध कारस्थान केले म्हणुन महाराजांनी जिथे असतील त्या शिर्क्यांची कत्तल केली आणि शिर्क्यांचे शिरकाण केले असा आरोप करतो. वा.सि.बेंद्रे, डॉ.कमल गोखले हे म्हणतात की शिरकाण म्हणजे शिर्क्यांचा प्रदेश. चिटणीसाने त्या शब्दाचा चुकीचा अर्थ लावुन महाराजांना बदनाम केले.

आरोप ७) संभाजी महाराज आणि दिलेरखान

दक्षिण भारतातील मोहीम करुन मोगल सरदार दिलेरखान स्वराज्याच्या दारात येऊन थांबला होता. त्याच्याशी उघड्यावर लढणे अडचणीचे होते, त्यामुळे युक्ती आणि डावपेचांचा वापर करुन दिलेरखानाचे संकट टाळणे आवश्यक होते. आक्रमक शत्रुला नेस्तनाबुत करण्यासाठी आपला माणुस शत्रुच्या गोटात पाठवुन त्याला बेसावध करणे हे राजकिय तंत्र शिवरायांना अवगत होते. त्याचाच वापर त्यांनी या प्रकरणात केला. संभाजी महाराजांनी दिलेरखानाच्या आक्रमणाची धार कमी करण्याचे काम केले. या काळात स्वराज्यावर हल्ले झाले नाहीत. भुपाळगडवरील थोड्याश्या जिवितहानीचा अपवाद वगळता मोठी जीवितहानी टाळण्याची खेळी यशस्वी झाल्यानंतर शंभुराजे पुन्हा स्वराज्यात दाखल झाले. शिवरायांनी त्यांचे मोठे स्वागत केले. या काळात त्यांच्यात पत्रव्यवहार सुरु होता. औरंगजेब शंभुराजांना अटक करणार असल्याचा सुगावा लागताच शंभुराजे शिवरायांचा विजापुरचा वजीर मित्र मसुदखान याच्या सहाय्याने पन्हाळगडावर स्वराज्यात दाखल झाले. या घटनेची माहिती व्यंकोजीराजांना देताना शिवराय लिहितात, “चिरंजीव राजश्री संभाजीराजे मोगलाईत गेले होते. त्यास आणावयास उपाय बहुतप्रकारे केला; त्यासही कळो आले की ये पातशाहीत अगर विजापूरचे अगर भागानगरचे पातशाहीत आपले मनोगतानुरुप चालणार नाही. ऐसे जाणोन त्यांणी आमचे लिहिण्यावरुन स्वार होऊन आले. त्यांची आमची भेट झाली. घरोब्याच्या रीतीने जैसे समाधान करुन ये तैसे केले.” या पत्रावरुन संभाजी महाराजांचे दिलेरखानाकडे जाणे म्हणजे स्वराज्यद्रोह नव्हता उलट त्यातील “करुन ये” हा शब्दप्रयोग महाराजांच्या राजकीय डावपेचाकडे लक्ष वेधतो.

छत्रपती शंभुराजांच्या चरित्राचा जागर आज सर्वत्र होताना दिसत आहे. महाराजांच्या निष्कलंक चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्या इतिहासकार, नाटककार, चित्रपटकार लोकांच्या विस्मृतीत गेले. शंभुसूर्य आजही तेजाने तळपत आहे…

संकलन – अनिल माने

© लोकराज्य टीम.

Leave A Reply