शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात ही संकल्पना काय आहे ?

0

शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात संकल्पनेविषयी थोडक्यात माहिती…

छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महापुरुष सहजासहजी घडत नाहीत. काळाच्या क्षितिजावर निर्माण झालेल्या अंधकारमय सामाजिक, धार्मिक, राजकीय परिस्थितीतुनच “शिवाजी” नावाच्या सूर्याचा उदय होत असतो.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले संपुर्ण आयुष्य समाजातील अंधकार दुर करण्यासाठी व्यतीत केले. म्हणुनच आज शेकडो वर्षांनंतर सुद्धा समाजात आदर्शवादी मानवी व्यवहाराचे मुर्तीमंत उदाहरण म्हणुन छत्रपती शिवरायांना आठवावे लागते. अनेक सामाजिक प्रबोधनांच्या कार्यक्रमांमध्ये छत्रपती शिवरायांच्या संदर्भातील उदाहरणे दिल्याशिवाय कार्यक्रम पुर्ण होत नाहीत.

छत्रपती शिवरायांच्या कार्याच्या महतीमुळे आज शेकडो वर्षांनंतरही शिवजयंती समाजातील सर्व घटक मोठ्या उत्साहात साजरी करत असतात.

शिवजयंतीचा प्रवास

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणलं की काही काळापुर्वी गावोगावच्या चौकात महाराजांची मुर्ती किंवा प्रतिमा मांडुन आजुबाजुला पताके, झेंडे लावायचे आणि स्पीकरवर शाहिरी पोवाडे वाजवायचे असे स्वरुप होते. त्यापुढच्या काळात डॉल्बी, डिजेचा प्रभाव वाढला आणि शिवजयंतीच्या मोठमोठ्या मिरवणुका निघु लागल्या. मिरवणुकीत सामील होणारी तरुणाई हळुहळु डीजेच्या तालावर थिरकु लागली. जयंती म्हणलं की डीजे पाहिजेच ही तरुणाईची मागणी बनली.

सगळीकडचेच चित्र निराशादायक होते अशातला भाग नाही, काही ठिकाणी आशादायक चित्रही बघायला मिळत होते. शिवजयंतीनिमीत्त सामाजिक प्रबोधनांच्या कार्यक्रमांचेही आयोजन होऊ लागले होते. वेगवेगळ्या व्याख्यानमाला, स्पर्धा, सामाजिक उपक्रम या माध्यमातुन शिवजयंती साजरी व्हायला सुरुवात झाली. डोक्यावर मिरवले जाणारे शिवराय डोक्यात कसे येतील यावर सामाजिक प्रबोधनांच्या कार्यक्रमाचा जोर राहिला.

या सगळ्यांचा आढावा घेतला तर दिसुन येते की आज आपण या प्रवासाच्या अशा एका टप्प्यावर आहोत जिथुन आपल्याला पुढे सरकण्याची गरज निर्माण झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज महाराष्ट्राबाहेर अनेक राज्यांत आणि जगातील विविध देशांत साजरी होत आहे. सामाजिक प्रबोधनांच्या कार्यक्रमांची संख्याही वाढली आहे. कधीकाळी डिजेसमोर थिरकणारे युवक आज स्वतःहुन “डिजेमुक्त शिवजयंती” साजरी करण्याचा आग्रह धरत आहेत.

शिवजयंतीच्या काळात कार्यक्रम, रोषणाई, सजावट, मिरवणुका, उपक्रम, इत्यादींसाठी होणाऱ्या खर्चाची उलाढाल करोडोंच्या घरात आहे. शिवजयंती निमीत्त गुंतवलेली वेळ, बुद्धी, श्रम, कौशल्य, पैसा (Input) आणि त्यातुन समाजाला मिळणारे लाभ (Output) याचा आज प्रकर्षाने विचार करण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती औपचारिकता म्हणुन साजरी होऊ नये. तिच्या माध्यमातुन समाजात आणि व्यक्तिगत आयुष्यात विधायक बदल घडावेत ही मागणी जोर धरत आहे. शिवजयंतीत नैतिक मुल्यांच्या प्रदर्शनापेक्षा त्यांचे अनुकरण करण्याची वृत्ती बळवावी ही अपेक्षा व्यक्त होत आहे.

नुसत्या डिजेवर मोठमोठ्याने महाराजांची गाणी वाजवली म्हणुन महाराज दुरपर्यंत पोहोचत नाहीत, शांतपणे महाराजांना आठवुन त्यांचे विचार आचरणात आणले तर महाराजांना जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारा समाज तयार होईल ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. गेल्या एक-दीड शतकापासुन शिवजयंती रस्त्यारस्त्यांवर आणि चौकाचौकात साजरी होत आहे. आपल्या घरात बसणारे गणपती आता चौकाचौकात विराजमान होऊ लागले परंतु चौकाचौकातील शिवराय आपण आपल्या घरापर्यंत आणता आले नाहीत. घरातुन बाहेर पडल्यानंतरच दिसणारे महाराज घरात दिसेनासे झाले. हे चित्र बदलण्यासाठीच शिवजयंतीच्या एका नव्या संकल्पनेचा जन्म झाला. ती म्हणजे शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात !

काय आहे घरोघरी शिवजयंती संकल्पना ?

शिवजयंतीला चौकाचौकात होणारा गोंगाट कमी करुन आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी शिवजयंती अगदी सणासारखीच आनंदमय वातावरणात सहकुटुंब साजरी करायची. छत्रपती शिवराय घराघरात आले तरच घरामध्ये शिवरायांच्या विचारांचे संस्कार येतील. आपल्या नव्या पिढीला शिवरायांच्या विचारांची ओळख घरातुनच व्हायला हवी. ही यामागची संकल्पना आहे. मागच्या दोन वर्षांपासुन ती राबविली जात आहे.

शिवजयंती घरोघरी कशी साजरी करायची ?

१) सकाळी लवकर उठुन दारात रांगोळी काढावी. घरावर भगवा झेंडा लावावा. स्वयंपाकघरात गोड अन्नपदार्थ बनवावेत. साखर, पेढे वाटावेत.

२) घरात छोटी-मोठी सजावट करावी. महाराजांची मुर्ती अथवा प्रतिमा ठेवावी. त्यास सहकुटुंब हार किंवा पुष्प, सुमनांजली अर्पण करावी.

३) घरातील मुलामुलींना आणि मित्रसमुहाला शिवचरित्रावरील पुस्तकं भेट द्यावीत. कुटुंब, मित्रपरिवारासमवेत शिवचरित्रावर चर्चा करावी. शिवचरित्रातील प्रेरणादायक गोष्टी लहानांना समजावुन सांगाव्यात.

४) तुम्ही जर शिवजयंती निमीत्त आयोजित केलेल्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी बाहेर जाणार असाल तर घरच्या इतर सदस्यांना घरात शिवजयंती साजरी करण्यासाठी प्रोत्साहित करावे.

५) जमल्यास समाजातील उपेक्षित, गरीब, शोषित, अनाथ अथवा गरजुंना यथाशक्ती मदत करावी.

६) सार्वजनिक वृक्षारोपण, स्वच्छता सारखे उपक्रम राबवावेत.

७) आपण घरी सहकुटुंब साजरी केलेल्या शिवजयंतीचे फोटो #घरोघरी_शिवजयंती या हॅशटॅगसह सोशल मिडीयावर अपलोड करावेत. जेणेकरुन या संकल्पनेचा जास्तीत जास्त प्रचार होऊन सर्वत्र घरोघरी शिवजयंती साजरी होईल.

घरोघरी शिवजयंती साजरी करताना कोणती काळजी घ्यावी ?

१) छत्रपती शिवरायांना आपण पौराणिक कथांमधील चमत्कार करणारे देव म्हणुन नाही, तर आदर्श जीवन जगण्यासाठीचे वास्तववादी प्रेरणास्रोत म्हणुन वंदन करा.

२) घरातील शिवजयंतीला कोणत्याही कर्मकांडाचे स्वरुप देऊ नका. घरी शिवजयंती साजरी करत असताना शिवरायांच्या प्रतिमेसमोर नारळ फोडणे, नैवेद्य दाखवणे, आरती म्हणणे, नवस बोलणे, उदबत्त्या-धुपारे लावणे असे तत्सम प्रकार टाळावेत.

“पाडवा, दसरा, दिवाळी जशी आपली संस्कृती
तशीच साजरी करु घरोघरी यंदाची शिवजयंती”

चला, ऐतिहासिक बदलाचे साक्षीदार व्हा. शिवजयंती घराघरात साजरी करुन शिवराय मनामनात पोहोचवा.

जय शिवराय !

शिवजयंती प्रचार समिती महाराष्ट्र.

अवश्य वाचा –

भारत-चीन सीमेवरील शिवस्मारकाची कथा

शिवजयंतीचा वाद निर्माण करणाऱ्यांना महाराजांचे पत्र

© लोकराज्य टीम.

Leave A Reply