जिजाऊ वंदना

0

मराठा क्रांती मोर्चा हा मराठ्यांनी, महाराष्ट्राने आणि देशाने अनुभवलेले सर्वात मोठे जनआंदोलन होते. २०१६-१७ मध्ये महाराष्ट्रात संपन्न झालेल्या ५८ मराठा क्रांती मोर्चांनी स्वतःचा असा एक वेगळा इतिहास निर्माण केला असला तरी याच मोर्चांनी अजुन एक आगळावेगळा विक्रम केला होता. मराठा क्रांती मोर्चांची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊंच्या जिजाऊ वंदना गायनाने तर समारोप राष्ट्रगीत गायनाने झाला. एकाच वेळी लाखोंच्या संख्येने लोक जिजाऊ वंदना आणि राष्ट्रगीत गाण्यासाठी जागेवर शांतपणे उभे राहतात, हा आगळावेगळा विक्रम मराठ्यांच्या नावावर आहे. याबद्दल मराठ्यांनी अभिमान बाळगायला हवा.

शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावेत असे आपण सर्वजण म्हणत असतो, परंतु घरोघरी शिवाजी जन्मायचे असतील तर आधी जिजाऊ जन्माला यायला हव्यात. त्यासाठी जिजाऊंच्या कार्याचा परिचय आपल्या सगळ्यांना असायला हवा. जिजाऊ वंदनेच्या माध्यमातुन जिजाऊंच्या चरित्राचा जागर आज महाराष्ट्रभर होत आहे. मराठ्यांचा कुठलाही सामाजिक कार्यक्रम असला की त्याची सुरुवात जिजाऊ वंदनेने होत आहे. लाखो मराठ्यांच्या संभाषणाची सुरुवात आज जय जिजाऊ या अभिवादनाने होत आहे. जय जिजाऊ जय शिवराय हे घोषवाक्य महाराष्ट्र मोठ्या अभिमानाने उच्चारत आहे. घरात मुलगी जन्माला आली तर तिच्या जन्माचे स्वागत “घरी जिजाऊ आल्या” अशा भावना व्यक्त करुन होत आहे. अनेक मराठ्यांच्या लग्नात मंगलाष्टकांमध्ये जिजाऊ वंदना गायली जात आहे. घरात कोणताही आनंदाचा सोहळा, वाढदिवस, गृहप्रवेश, नवीन व्यवसायाचे उद्घाटन असेल तर त्यात जिजाऊ वंदना गायली जात आहे. कित्येक शाळांच्या प्रार्थनेमध्येसुद्धा जिजाऊ वंदनेला स्थान मिळाले आहे. जिजाऊंच्या कार्याचा जागर सुरु झाल्यापासुन अनेक सकारात्मक बदल मराठ्यांमध्ये झाले आहेत.

आपणही आपल्या घरच्या मंगलप्रसंगी जिजाऊ वंदना घ्यावी. जिजाऊ वंदना एकट्याने किंवा सामुहिकरीत्या म्हणता येते. जिजाऊ वंदना गाणे म्हणजे आपण स्वतःला जिजाऊंच्या छायेत घेऊन जाण्यासारखे आहे.

______________________________________
जिजाऊ वंदना

जिजा माऊली गे, तुला वंदना ही |
तुझ्या प्रेरणेने, दिशा मुक्त दाही ||धृ||

भयातुन मुक्ती, मिळाली जनांना |
गुलामी कुणाला, कुणाचीच नाही ||१||
नसे दु:ख कोणा, नसे न्यून कोणा |
फुलांना मुलांना, नसे दैन्य काही ||२||
                        जिजा माऊली गे…

जशी पार्वती ती, प्रिया शंकरास |
तशी प्रेरिका गे, शहाजीस तूही ||३||
जसा संविभागी, बळी पुर्वकाळीं |
शिवाजी जनांच्या, तसे चित्तदेहीं ||४||
                        जिजा माऊली गे…


तुझ्या संस्क्रुतीने, तुझ्या जागृतीने |
प्रकाशात न्हाती, मने ही प्रवाही ||५||
तुला वंदिताना, सुखी अंग अंग |
खरा धर्म आता, शिवाचाच पाही ||६||
                       जिजा माऊली गे…

जय जय जय जय जिजाऊ…
जय जय जय जय जिजाऊ…
______________________________________

(या जिजाऊ वंदनेची प्रिंट काढुन आपल्या घरात लावा. घरातील सर्व आबालवृद्धांनी एकत्र येऊन दररोज तिचे गायन करा. ज्या घरात जिजाऊंच्या विचारांचं वातावरण असेल तिथली लहान मुलं शिवरायांच्या वाटेवर चालतील हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज भासणार नाही.)

Audio आणि Video स्वरुपातील जिजाऊ वंदना इथुन डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

© लोकराज्य टीम.

Leave A Reply