महेंद्रसिंग धोनीने इतक्या जोरात बॉल मारला की बॉलरची 2 बोटं मोडली !

रॉबिन उथप्पाने सांगितलेला एक अपरिचित किस्सा !

महेंद्रसिंग धोनी

३१ मार्च २०२३ पासून आयपीएलच्या १६ व्या हंगामाला सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना गतवर्षीचा विजेता संघ गुजरात टायटन्स (GT) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात पार पडणार आहे. या सामन्याच्या आधी रॉबिन उथप्पा याने महेंद्रसिंग धोनी बद्दल एक अपरिचित असा जुना किस्सा सांगितला आहे. हा किस्सा २००३ मधील आहे. रॉबिन उथप्पा नॅशनल क्रिकेट अकॅडमीच्या कॅम्पसाठी बंगळूर येथे गेला होता. तिथेच तो धोनीला पहिल्यांदा भेटला. त्यावेळी धोनीचे भारतीय संघात पदार्पण झाले नव्हते.

रॉबिन उथप्पाने सांगितला महेंद्रसिंग धोनीचा तो अपरिचित किस्सा…

जिओसिनेमाला दिलेल्या एका मुलाखतीत रॉबिन उथप्पा की, “मी महेंद्रसिंग धोनी याला पहिल्यांदा सन २००३ साली बंगळूरमध्ये नॅशनल क्रिकेट अकॅडमीच्या भारत अ कॅम्पमध्ये बघितलं होतं. बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर तो कॅम्प आयोजित केला होता. कॅम्पमध्ये धोनी फास्ट बॉलर मुनाफ पटेल विरुद्ध तो बॅटिंग करत होता. तिथं अविष्कार साळवी सारखे इतर बॉलरही होते. धोनी एकामागून एक लांब सिक्सर मारत होता. अधूनमधून त्याचे हेलिकॉप्टर शॉट देखील बघायला मिळत होते. त्याने मारलेले काही बॉल तर स्टेडियमच्या बाहेर गेले होते.” पुढे रॉबिन उथप्पाने धोनीविषयीचा तो अपरिचित असा किस्सा सांगितला, ज्यात धोनीने एका तडाखेबाज शॉटद्वारे बॉलिंग करणाऱ्या बॉलरची बोटं मोडली होती. उथप्पा सांगतो…

..महेंद्रसिंग धोनीचा तो शॉट आणि बॉलरची बोटं मोडली

कॅम्पमध्ये धोनीची तुफान फटकेबाजी करत होता. समोर श्रीधरन श्रीराम बॉलिंगला आला. श्रीधरनच्या एका बॉलवर धोनीने पुढे सरसावत त्याच्याच दिशेने एक तडाखेबाज शॉट मारला. बॉलिंग करणाऱ्या श्रीधरनने बॉल अडवण्यासाठी हात मध्ये घातला. परंतु बॉल त्याच्या हाताला लागून पुढे निसटला. आम्हाला वाटले श्रीधरन पुन्हा बॉल अडवण्यासाठी पळत आहे, पण तो पळत पळत सरळ मैदानाबाहेर ड्रेसिंग रूममध्ये गेला. बॉल अडवताना श्रीधरनचे बोट तुटल्याचे लगेच आमच्या लक्षात आले. धोनीचा तो खेळ पाहून तो भविष्यात भारतीय संघाकडून खेळेल असा अंदाज मला आला होता. पुढे रॉबिन उथप्पाचा हा अंदाज खरा ठरला. २३ डिसेंबर २००४ रोजी बांगलादेशविरुद्ध चितगाव येथील सामन्यात महेंद्रसिंग धोनी याने भारतीय संघाकडून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर धोनीने आपल्या खेळातून इतिहास घडवला, ज्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत.