पानिपतचा रोड मराठा

0

जगात विखुरलेल्या मराठा समाजाचा शोध घेण्याचा छोटासा प्रयत्न…

१७६१ साली पानीपत येथे झालेल्या तिसऱ्या मराठा(पेशवा) विरुद्ध अब्दाली युद्धाचा इतिहास जितका रंजक आहे तितकाच रंजक भाग या युद्धानंतर सुद्धा आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर पानीपतचा भाग हरियाणा राज्यात समाविष्ट झाला. हरियाणात जाट समुदाय मोठ्या संख्येने आढळतो. मात्र पानीपत आणि आसपासच्या भागात राहत असणारा एक समुदाय जाटांपेक्षा वेगळा होता. त्यांचे राहणीमान, चालीरीती स्थानिकांपेक्षा वेगळ्या होत्या.

हे लोक कोण ? कुठले ? इथे कसे आले ? त्यांचा पुर्वइतिहास काय याविषयी कुणालाच माहिती नव्हती. हा समुदाय स्वतःची ओळख “रोड” अशी सांगत होता. मात्र आपण कोण, आपले पुर्वज कोण याची माहिती खुद्द त्यांनासुद्धा नव्हती. या समुदायाचा पुर्व इतिहास शोधुन काढणे हे काम आव्हानात्मक होते.

दरम्यान महाराष्ट्रातील काही इतिहास संशोधक पानीपत युद्धभुमी अभ्यासाच्या संदर्भाने गेले असताना त्यांनी त्या भागातील लोकांच्या गाठीभेटी घेतल्या. रोड समुदायाच्या लोकांना भेटल्यानंतर त्यांना कुतूहल वाटले. या रोड लोकांचे राहणीमान आणि चालीरीती बऱ्याच अंशी महाराष्ट्रातील मराठा समाजाशी मिळत्याजुळत्या आहेत असे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्या अभ्यासाअंती असे लक्षात आले की या रोड समुदायाचा १७६१ साली झालेल्या पानीपत युद्धापुर्वीचा कोणताही लिखीत किंवा ज्ञात इतिहास उपलब्ध नाही. जो काही इतिहास आहे तो सगळा १७६१ नंतरचा..

रोड समुदायाचे राहणीमान, चालीरीती, परंपरा यांचा समाजशास्त्रीय, मानववंशशास्त्रीय सविस्तर अभ्यास करुन महाराष्ट्रातील प्रसिद्ध इतिहास संशोधक प्रा.वसंतराव मोरे यांनी सिद्ध केले की हे रोड लोक दुसरे तिसरे कोणी नसुन मुळचे महाराष्ट्रातील मराठेच आहेत. या संशोधनावर आधारित “रोड मराठोंका इतिहास” नावाचे सविस्तर पुस्तक त्यांनी लिहले आहे. आपल्या मुळ वारशाची ओळख झाल्यानंतर या रोड समुदायाने आता आपली ओळख अभिमानाने “रोड मराठा” अशी सांगण्यास सुरुवात केली आहे.

रोड मराठा आणि पानीपत युद्ध !
पानिपतचे तिसरे युद्ध अहमदशहा अब्दाली आणि मराठा (पेशवा) यांच्यात लढले गेले. या युद्धात लढण्यासाठी सदाशिवराव भाऊ पेशव्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरातील मराठा मावळे सहभागी झाले होते. या युद्धात मराठ्यांनी पराक्रमाची अत्यंत शर्थ केली. अर्धपोटी, अगदी झाडाचा पाला खाऊन तलवार चालवत अब्दालीच्या तोंडचे पाणी त्यांनी पळविले. मात्र या संपुर्ण मोहिमेत पेशव्याच्या कमकुवत नेतृत्वाचे दर्शन घडले आणि प्रत्यक्षात युद्धभुमीवर असंख्य मराठे मारले गेले.

युद्धाच्या शेवटी अब्दालीच्या ताज्या दमाच्या फौजेच्या जीवघेण्या आक्रमणातुन आपले प्राण वाचवण्यासाठी लढाईत जखमी झालेले अनेक मराठा सैनिक आजुबाजुच्या जंगलात निघुन गेले. अनेकजणांना युद्धकैदी बनवुन पुढे त्यांना गुलाम म्हणुन विकण्यात आले. वातावरण निवळेपर्यंत जखमी सैन्य जंगलातच राहिले. सर्व प्रदेश शत्रुच्या ताब्यात होता. सर्वत्र भीतीचे सावट होते. त्यावेळी पानीपत युद्धातुन वाचलेल्या जवळजवळ २९८ कुटुंबांनी आपला जीव वाचवण्यासाठी नाईलाज म्हणुन आपली ओळख मराठा अशी न सांगता तिकडच्या एका रोड राजाच्या नावावरुन रोड समुदाय अशी सांगायला सुरुवात केली. ही नवी ओळख घेतल्यानंतर त्यांना निर्धोकपणे जगता येऊ लागले. पुढे कालौघात त्यांची ओळख रोड समुदाय अशीच सर्वत्र होऊ लागली.

रोड मराठे आणि मराठी संस्कृती !

पानीपत युद्धानंतर आज २५७ वर्षाच्या कालखंडात रोड मराठ्यांनी “देश तसा वेष” या तत्वानुसार आपल्या जीवनात हरियाणाच्या संस्कृतीला स्थान देत असतानाच आपली मुळ मराठी संस्कृतीचेही जतन केल्याचे पहायला मिळते.

१) रोड मराठ्यांच्या आडनावात पवारचे पनवार, महालेचे महल्ले/महालान, दुधानेचे दौंदणे, जोगदंडचे जागलान, बोधलेचे बोधला असे बदल झालेले आहेत.

२) शिंक आल्यानंतर रोड मराठ्यांच्या तोंडातुन आपसुक “जय शिवाजी” हे शब्द बाहेर पडतात. रोड मराठा समाज छत्रपती शिवरायांना खुप मानतो.

३) अनेक रोड मराठा बांधव स्वतःचा उल्लेख आवर्जुन मराठा चौधरी (आपल्याकडचे मराठा पाटील) असा करतात.

४) आपली संस्कृती जपण्यासाठी रोड मराठा फक्त आपसातच रोटी-बेटी व्यवहार करतात.

५) रोड मराठ्यांना आजही घोडे पाळण्याची हौस आहे.

६) रोड मराठा समाजाच्या घरांची दारे महाराष्ट्रातील घरांच्या दारासारखी असतात. दारावर छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प किंवा चित्र आढळते.

रोड मराठा समाजाविषयी काही अपरिचीत माहिती !

१) पानीपत, लोथल, करनाल, सोनपत, कुरुक्षेत्र भागातील जवळपास २०० गावांमध्ये हा रोड मराठा समाज पसरलेला असुन त्यांची आजची लोकसंख्या जवळजवळ ८ लाख आहे. कुरुक्षेत्रच्या पुंडरी मतदारसंघात रोड मराठ्यांची संख्या जास्त असुन रोड मराठा नेते चौधरी ईश्वरसिंग चारदा आमदार राहिलेले आहेत. १९९१-९६ काळात ते हरियाणा विधानसभा उपाध्यक्ष होते. त्यांचे चिरंजीव तेजवीरसिंग आज आमदार आहेत.
२) १४ जानेवारी २००५ रोजी पानीपत जवळील करनाल येथे महाराष्ट्रातील “मराठा सेवा संघ” आणि हरियाणातील “मराठा जागृती मंच” यांनी मिळुन “मराठा मिलन समारोह” हा भव्य मेळावा घेऊन ८ लाख रोड समुदायाला “रोड मराठा” अशी नवी ओळख प्राप्त करुन दिली.

३) १४ जानेवारी २०११ पासुन हरियाणातील रोड मराठा आणि महाराष्ट्रातील मराठा बांधव एकत्र येऊन हा दिवस दरवर्षी “मराठा शौर्यदिन” म्हणुन साजरा करतात. या सोहळ्याचे आयोजन रोड मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते मराठा विरेंद्रसिंह वर्मा हे करतात.

४) भारताच्या हॉलीबॉल, कबड्डी, बॉक्सिंग या संघामध्ये रोड मराठा समाजाच्या अनेक खेळाडुंनी नेतृत्व केले आहे. रिओ ऑलम्पिक मध्ये खेळणारा बॉक्सर मनोज कुमार हा रोड मराठा आहे.

५) बॉलीवुड अभिनेत्री प्रीती झिंटा हिने एका मुलाखतीत आपले पुर्वज मराठा असल्याचे सांगितले होते. त्यांचे पुर्वीचे नाव झिंट्ये होते. हरयाणवी प्रदेशात ते झिंटा असे झाले.

६) रोड मराठा समाजात मराठा जागृती मंच, छत्रपती शिवाजी विद्यार्थी मंच, छत्रपती शिवाजी सेवा संस्था, पानीपत फाऊंडेशन अशा वेगवेगळ्या सामाजिक संघटना कार्यरत आहेत.

७) रोड मराठा समाजाचा मुख्य व्यवसाय शेती असुन हरितक्रांतीच्या माध्यमातुन त्यांनी शेतीचे उच्च तंत्र आत्मसात केले आहे. एकही रोड मराठा शेतकरी आत्महत्या करत नाही.

८) तीस चाळीस वर्षांपुर्वी महाराष्ट्राच्या सांगली, आटपाडी, विटा, खटाव, खानापुर भागातल्या अनेक मराठा बांधवांनी याच संबंधांच्या आधारे पानीपतला जाऊन सोने-चांदी गाळण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. पानिपतच्या रस्त्यांवर फिरताना अनेक दुकानांची नावे जय शिवाजी ज्वेलर्स, महाराष्ट्र ज्वेलर्स, खटाव ज्वेलरी, ज्योतिर्लिंग रिफायनरी अशी मराठीत आढळतात.

९) पानीपत युद्धभुमीवरील “काला आम” याठिकाणी राज्य सरकारने पानीपत युद्ध स्मारक बांधले असुन त्याला पर्यटनस्थळ म्हणुन विकसित केले आहे.

१०) अलीकडच्या काळात पानीपतचे अनेक तरुण रोड मराठा लोक शिवराज्याभिषेक दिन, राष्ट्रमाता जिजाऊ जयंती, शिवजयंती, छत्रपती संभाजी महाराज जयंती अशा सोहळ्यांसाठी महाराष्ट्रात उपस्थित राहतात. आपल्या पुर्वजांच्या भुमीत आल्यानंतर त्यांच्यात एक वेगळाच उत्साह संचारतो.

महाराष्ट्रातील मराठा बांधवांनीही आपल्याकडे यावे, त्यांचा पाहुणचार करण्याची संधी आपल्याला मिळावी अशी रोड मराठा समुदायाची भावना आहे. महाराष्ट्रातुन तिकडे जाणाऱ्या लोकांसाठी त्यांनी आलिशान असे खास “गेस्ट हाऊस” उभारले आहे. दिल्ली किंवा त्याभागात जाणाऱ्या मराठा बांधवांनी आपल्या रोड मराठा बांधवांच्या भेटीगाठी घेऊन हा स्नेह वाढवावा…

लेखन – अनिल माने.

© लोकराज्य टीम.

Leave A Reply