शिवजयंती वरुन तारीख-तिथी वाद निर्माण करणाऱ्यांना महाराजांचे पत्र

0

माझ्या मर्द मावळ्यांनो,  खुप दिवसांपासुन  तुमच्याशी  मनातलं  बोलायचं होतं…

मावळ्यांनो, माझं थोडं ऐकाल का ? इतिहासात आम्ही रयतेचं स्वराज्य स्थापन करण्यासाठी आमचं आयुष्य खर्ची घातलं, म्हणुन आज वर्तमानात आमचा गौरव केला जातो. आमच्यावर चित्रपट, नाटके काढली जातात. पुस्तकं लिहली जातात. व्याख्यानं दिली जातात. मोठमोठ्या संस्थांना, गावांना, सरकारी योजनांना आमचे नाव दिलं जातं. आमच्या आयुष्यातील घटनांची आठवण म्हणुन दिनविशेष उपक्रम घेतले जातात. हे सगळं काही ठीक आहे. परंतु…

आमच्या मनाला एका गोष्टीची फार खंत आहे. आमची जयंती साजरी करण्यावरुन मराठी लोकांमध्ये एकमत नाही. आमच्या होणारा उपहास पाहुन तत्कालीन राज्य सरकारने १९६६-६७ साली आमच्या जयंतीची तारीख निश्‍चित करण्यासाठी अभ्यासकांची एक समिती नेमली. इतिहासकारांचा समावेश असलेल्या या समितीने शिवजयंती १९ फेब्रुवारीला साजरी करण्याची शिफारस केली. राज्य सरकारने ती मान्यही केली. तेव्हा “चला, आता आपल्या जन्मदिवसाचा मुद्दा निकालात निघाला आहे” असे आम्हाला वाटले होते.

मात्र आमचा हा आनंद तुमच्यातीलच काहीजणांनी जास्त काळ टिकुन दिला नाही. समितीत राहुन १९ फेब्रुवारी ही तारीख निश्चित करणाऱ्या आणि आमच्या नावावर पोट भरणाऱ्या तुमच्यातीलच काही इतिहासकारांनी तारीख ही “इंग्रजी कालगणने”नुसार असल्याचा मुद्दा पुढे करत आमची जयंती “तिथीप्रमाणे”च साजरी करण्याचा आग्रह धरला. इथे आम्हाला त्यांनी दुसऱ्यांदा जन्म घेण्यास भाग पाडले. त्यातच वैशाख महिन्यात “परंपरे”ने तिसऱ्यांदा आम्हाला जन्म घेण्यास भाग पाडणारेही तुमच्यातलेच आहेत.

आज तारखेनुसार आमची जयंती तुम्ही मोठ्या उत्साहात साजरी करत आहात. सर्व सरकारी कार्यालयांत आमच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात येते. वृत्तपत्रांतही आमचे अलौकिक व्यक्तिमत्त्व, कार्याचे स्मरण करणारे लेख लिहिले जातात. किल्ले शिवनेरीवरील जयंती सोहळ्याला तर दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उपस्थिती लावुन “शिवरायांच्या स्वप्नातील महाराष्ट्र” घडविण्याचा निश्‍चय बोलुन दाखवतात. सातासमुद्रापार पलीकडेही आमची जयंती साजरी व्हायला सुरुवात झाल्याचे ऐकायला मिळत आहे. त्याबरोबरच तिथीनुसारही आमची जयंती अनेक ठिकाणी साजरी होत असते. तुरळक ठिकाणी परंपरेची जयंतीसुद्धा होत आहे.

तुम्हाला खरं सांगु का ? तुम्ही आज कितीही उत्साहाने आमची जयंती साजरी करत असला तरी आम्ही मात्र काहीसे उदास, उद्विग्न आहोत. मराठी माणुस म्हणजे भांडकुदळ, त्याचे लवकर कुणाशी एकमत होत नाही, असे आम्हीही ऐकत आलो आहोत. परंतु तुमच्या या अहंकाराच्या लढाईत जगात कुणाच्याही वाट्याला न आलेलं तीनदा तीनदा जन्म घ्यावं लागण्याचं दुर्भाग्य आमच्या वाट्याला आलं याचं आज दुःख आहे.

एवढं पुरेसे झाले नाही म्हणुन की काय “राजे परत जन्माला या” अशी हाक मारली जाते. राजांनी तरी किती वेळा जन्माला यावं ? आणि का जन्माला यावं, तुमची भांडणं बघण्यासाठी ? तुम्हाला एकत्र आणण्यासाठी प्रत्येकवेळी आमचीच गरज का लागते ? आम्ही जे निर्माण केलं ते जर तुम्हाला जपताच येत नसेल तर मग आम्ही जन्माला येऊन उपयोग काय ? उलट आज आमच्या तीन-तीन जयंत्या करुन सगळ्यांनी जी क्रुर थट्टा लावली आहे ती बंद करा, असा आदेशच आता आम्हाला काढावा लागेल.

दुसरं एक बोलायचं आहे, तुम्ही बदलत्या काळानुसार आमची जयंती साजरी करण्याची पद्धतही पार बदलुनच टाकली आहे. जयंतीच्या मिरवणुकीत कानठळ्या बसवणारा दणदणाटी आवाज, दुरवर सोडलेले प्रकाशझोत, चौकाचौकात लावलेले पडदे, गळ्यात भगवी उपरणी गुंडाळुन केला जाणारा नाच हे आज आमच्या जयंतीचे चित्र आहे. इतरांचा अजिबात विचार न करता आपल्याच तालावर बेधुंद नाचणारे आजचे मावळे पाहिले की…(खर तर तुम्हाला मावळे आणि तुमच्या वेड्यावाकड्या थिरकणाऱ्या पावलांना नृत्य तरी कसे म्हणावे) आम्हाला बेभान होऊन पराक्रमाचे तांडव करणाऱ्या तानाजी, जिवाजी, बाजीप्रभु, मुरारबाजी या सर्वांची खुप आठवण येते. तसा पराक्रम, तसे साहस आता कुठे ?

रस्त्यांवरुन भगवा झेंडा लावलेल्या आणि वेड्यावाकडया चालणाऱ्या दुचाक्‍यांचे मोठमोठ्याने भोंगे वाजवत संचलन काढुन आमच्यावरचे प्रेम व्यक्त करण्याची नवीन पद्धतच आली आहे अलीकडे. या संचलनात रहदारीचा, वृद्ध, बालक, आजारी लोकांचा जराही विचार केला जात नाही. अरे आम्ही आयुष्यभर रयतेची अपार काळजी वाहिली रे. त्यामुळे हे चित्र बघवत नाही आम्हाला. अशा पद्धतीने आमचा उदाउदो करण्याची खरच गरज आहे का, याचा विचार तुम्ही करायला हवा. अर्थात काही ठिकाणी दांडपट्टा, तलवारबाजी, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, झांज, ढोलताशे, सनईच्या मंजुळ आवाजावरील पालखी, चित्ररथ पाहुन आमचे मन सुखावतेही. मात्र आम्हाला ते पुरेसे वाटत नाही.

आमच्या स्वप्नातील महाराष्ट्र शोधण्याचा आम्ही खुप प्रयत्न करत आहोत. पण सध्या आमच्या नजरेस पडतोय तो फक्त दुरवर पसरलेला भीषण दुष्काळ आणि पाण्याच्या थेंबाथेंबासाठी आसुसलेली रयत. दुष्काळाला निसर्ग कारणीभुत असेलही. पण राज्यकर्ते आणि रयतेनेही जागे होण्याची गरज आहे. आम्ही रयतेच्या पाण्यासाठी केलेल्या शिवकालीन पाणीपुरवठ्याचे आजही सर्वत्र कौतुकं होते. मग, आजच्या काळात तंत्रज्ञान, सामग्री, मनुष्यबळ हाताशी असताना हंडाभर पाण्यासाठी रयत टाचा का घासते ?

शिवजयंती : महाराष्ट्राचा आधुनिक सण

माझ्या प्रिय मावळ्यांनो, स्वातंत्र्यात जन्मलेली आणि त्याचा मनमुराद उपभोग घेणारी ही तुमची पिढी. तिला स्वातंत्र्याचे मोल तरी कसे कळणार ? पण हे मोल समजण्यासाठी आणखी कुणा औरंगजेब किंवा अफजलखानाला आक्रमण करण्याची वेळ येऊ नये, म्हणजे झालं. खरंतर आजचा औरंगजेब वेगळा आणि आजचा अफजलखानही वेगळा.. तुमचा तुम्ही तो ओळखायचा आणि त्याच्यावर मात करायची.

आमच्या आबासाहेबांनी आम्हाला बंगळुरवरुन पुण्याला पाठवताना भगव्या झेंड्यासोबत या आम्हाला राजमुद्रा दिली होती. त्या राजमुद्रेतच त्यांनी आम्हाला “वर्धिष्णुविश्ववंदिता” म्हणजे विश्वव्यापक होण्याची शिकवण दिली होती. त्यानुसार आम्ही जगलो, वागलो, जगण्याचे, वागण्याचे नियमही तयार केले आणि ते पाळले. महाराष्ट्राची ओळख जगात घेऊन गेलो.

परंतु तुम्ही लोकांनी आम्हाला धर्म, जात, प्रांत, देश, राज्य अशा छोट्या छोट्या चौकटीत बंदिस्त करुन संकुचित केले आहे. त्यात आता आमच्या जयंतीलाही जगात चालणाऱ्या तारखेप्रमाणे विश्वव्यापक करायचे सोडुन फक्त महाराष्ट्रातच चालणाऱ्या तिथीत बंदिस्त केले आहे. तुम्ही तारीख-तिथी मानु नका हे मी म्हणणार नाही, परंतु तुमच्या अहंकाराच्या वादात आम्हाला मर्यादित करु नका एवढंच म्हणेन. माझ्या जगभरातील मावळ्यांना मला प्रेरणा द्यायची आहे. आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचु द्या. आजच्या पुरती तुम्हाला एवढीच साद घालतो आणि थांबतो…
– शिवाजीराजे शहाजीराजे भोसले.

संकलन – लोकराज्य टीम.

Leave A Reply