स्वामी विवेकानंद यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे विचार

0

स्वामी विवेकानंद छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय सांगतात ?

१२ जानेवारी हा स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन ! भारतीय युवा वर्गावर आज स्वामीजींच्या प्रेरणादायी विचारांचे गारुड आहे. स्वामीजींनी भारतीय धर्म, परंपरा, संस्कृती यांच्यावर वेगळ्या नजरेतुन प्रकाश टाकला. त्यांचे विचार वाचण्यासारखे आहेत.

स्वामीजींनी आपल्या देशाचा इतिहास अभ्यासत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचाही इतिहास अभ्यासला होता. त्यांनी डॉ.एम.सी.नांजुंदा राव यांच्याशी चर्चा करताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपले काही विचार व्यक्त केले होते. त्यांनी व्यक्त केलेले ते विचार त्यावेळी शिवाजी महाराजांविषयी उपलब्ध असणाऱ्या आणि स्वामीजींच्या वाचनात आलेल्या माहितीच्या आधारे होते.

आज इतिहासाचे संशोधन झाल्यानंतर त्यावेळचे स्वामीजींचे विचार आणि आजचे संशोधन यातील विवरणात फरक आढळुन येतो. मात्र स्वामी विवेकानंदांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विलक्षण आदर होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून सर्व भारतीयांनी आपली संस्कृती जतन करण्यासाठी आणि आपली राष्ट्रभक्ती पुनरुज्जीवित करण्यासाठी काय आत्मसात करणे आवश्यक आहे, याबद्दल स्वामीजींनी जे विचार व्यक्त केले होते, ते विचार सार रुपाने येथे देत आहोत.

स्वामी विवेकानंदांच्या नजरेतुन छत्रपती शिवराय

१) “छत्रपती शिवाजी महाराज” हे भारतातील हजारो वर्षांत निर्माण झालेले महान राजे होते. ज्यावेळी आपला समाज आणि धर्म धोक्यात आला होता, त्यावेळी त्यांनी समाजाला आणि धर्माला नाशापासुन मुक्त केले.

२) छत्रपती शिवाजी महाराज एक अतुलनीय नायक होते. आपल्या देशाच्या भवितव्यासाठी ते नेहमी आशावादी प्रकाशाप्रमाणे उभे राहिले.

३) छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीयांच्या भावी पिढ्यांना आकार दिला. भारताचे राज्य अखंड ठेवावे हे त्यांचे स्वप्न होते.

४) छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श पुरुष, महात्मा, देशभक्त आणि थोर राजा दुसरा कोणीही नाही. महान धर्मकाव्यात आदर्श म्हणुन वर्णिलेल्या जन्मजात राज्यकर्त्यांचा आविष्कार म्हणजे शिवाजी महाराज !

स्वामी विवेकानंद आणि डॉ.एम.सी.नांजुंदा राव 

५) भारताच्या अस्मितेचे यथार्थ प्रतीक असणारा भरतभूमीचा खराखुरा पुत्र म्हणजे शिवाजी महाराज ! भविष्यात आज ना उद्या भारत कसा बनेल, अनेक स्वतंत्र राज्ये एका सार्वभौम छत्राखाली कशी येतील हे स्पष्टपणे दाखविणारे तेच होते.

६) छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहताना परकीय लेखकांनी मुसलमानी बखरींवर भिस्त ठेवुन महाराजांची “लुटारु” म्हणुन निंदा केली तर मराठी लेखकांनी जुन्या पौराणिक समजुतींना धरुन शिवाजी महाराजांना देवाचा अवतार करुन ते भक्तांसाठी धर्म स्थापना करण्यासाठी आले होते अशा प्रकारचे अतिमानवी दैवी उत्पत्ती असल्यासारखे लिखाण केले. मात्र बऱ्याच पर्शियन हस्तलिखितांचा धांडोळा घेऊन त्याचा अनुवाद केला तर शिवाजी महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पराक्रमी कर्तृत्वाची योग्य माहिती उघडकीस येईल.

७) छत्रपती शिवाजी महाराज हे समर्थ नेते होते. मराठा राजवंशाच्या या आदिपुरुषाने पुढे भरभराटीला आलेल्या मराठा साम्राज्याची भारतात स्थापना केली.

८) छत्रपती शिवाजी महाराजांना थोर बनविण्यास अनेक संस्कार कारणीभूत झाले, त्यात मुख्य संस्कार होता जिजामातेचा ! साऱ्या आयुष्यभर त्या महाराजांच्या प्रेरणादायिनी मार्गदर्शक व संरक्षक होत्या. जीवनध्येयावर निष्ठा हा गुण महाराजांना आईकडुनच मिळाला होता. प्रत्येक आणीबाणीच्या प्रसंगी शिवाजी महाराज आपल्या आईचा आशीर्वाद घेत असत.

९) छत्रपती शिवाजी महाराजांचे निवासस्थान डोंगरी किल्ल्यांनी वेढले होते आणि तेच आपले संरक्षक आहेत अशी त्यांची भावना होती. स्फुर्ती देणारी माता आणि डोंगरी किल्ल्यातील वसतिस्थान मिळाल्याने शिवाजी महाराजांच्या अंगी काटकपणा आणि साहसी वृत्ती निर्माण झाली.

१०) छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धातील पराक्रम किंवा उत्कृष्ट राज्यव्यवस्था या ऐतिहासिक बाबी आहेत. आपल्या तरुण नेत्याची धाडसी वृत्ती त्यांच्या अनुयायांना आवडली आणि ते जवान सुद्धा शिवाजी महाराजांच्या महत्त्वाकांक्षी कार्यात सहभागी झाले.

११) छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व इतके आकर्षक होते की, शिवाजी महाराजांनी लढाई जिंकल्यानंतर शत्रूसुद्धा त्यांचा विश्वासू अनुयायी बनत असे. स्वतःच्या व्यक्तिमत्वामुळे शिवाजी महाराज लहानांपासून थोरांपर्यंत आपल्या सर्व अनुयायांना स्वतःच्या ध्येयभावनेने भारून टाकत असत.

१२) स्वतःच्या स्वार्थाकडे दुर्लक्ष करून समाज व देशहितासाठी जीवन वाहून घेणे शिवाजी महाराजांच्या आयुष्याचे ध्येय होते.

१३) छत्रपती शिवाजी महाराजांचे हृदय हे विशाल व पवित्र होते. ऐहिक गोष्टींबद्दल त्यांना यत्किंचितही आसक्ती नव्हती. तात्कालिक लाभ, व्यक्तिगत आकांक्षा यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून, आपल्या परमोच्च ध्येयाला सुसंगत अशा जीवनतत्वांना धरून व्यक्तिगत व्यवहार व राज्यशासनाचे जे नियम त्यांनी स्वतः ठरविले, त्यांना ते न चाळता धरून राहिले.

१४) छत्रपती शिवाजी महाराजांचे खाजगी जीवन विषय-लोलुपतेने बरबटलेले नव्हते व सार्वजनिक आयुष्यही कलंकरहित होते. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी निरुपाय म्हणुन त्यांना काही गोष्टी (अफजलखान प्रकरण) भाग पडले व त्याच आक्षेपार्ह मानल्या जातात. पण तसे मानण्यास थोडी आधार नाही.

१५) छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सरदार व सैनिकांना स्त्रिया, मुले, वृद्ध व सामान्य रयतेला उपद्रव न देण्याबद्दल बजावले होते. स्त्रियांच्या अब्रूचे रक्षण करण्याबाबत ते पित्याच्या प्रेमळपणाने वागत असत. रीतसर लग्न केलेल्या पत्नींव्यतिरिक्त अन्य स्त्रीशी शिवाजी महाराजांचा जराही संबंध नव्हता, हे त्यांना अत्यंत भूषणावह होते.

१६) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नींकडे नम्रता व शहाणपणा होता. धामधुमीच्या काळात त्या महाराजांच्या पाठीशी उभ्या राहत असत. अडचणींच्या काळात महाराजांना त्या अभिप्राय देत.

१७) शत्रूपक्षाच्या शरण आलेल्या वृद्ध, तरुण, स्त्रिया यांना शिवाजी महाराज कनवाळूपणे वागवत. यावरून शिवाजी महाराजांचे विशाल हृदय व औदार्य स्पष्ट होते.

१८) मराठी मनाला जागृत करुन त्याच्यात राष्ट्रभावना निर्माण करून वाढीला लावण्याचे महान सेवाकार्य संतसज्जनांनी आपल्या उपदेश, प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून केले. संत तुकारामांंचा प्रभाव शिवाजी महाराजांवर होता.

स्वामी विवेकानंदांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

वाचा – जिजाऊ जयंती निमित्त खास लेख : जिजाऊ चरित्रातुन काय शिकावे ?

© लोकराज्य टीम.

Leave A Reply